मनुष्यशक्तीचा अंदाज घेऊन अभ्यासक्रम राबवावा
By admin | Published: January 22, 2015 12:55 AM2015-01-22T00:55:25+5:302015-01-22T00:55:36+5:30
विनय सहस्त्रबुद्धे : कर्मवीर काकासाहेब वाघ चरित्रग्रंथाचे प्रकाशन
पंचवटी : शिक्षणसंस्था, महाविद्यालये, तसेच विद्यापीठाने लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केल्यास त्याचा समाजाला फायदाच होईल. शिक्षणसंस्था व शिक्षण प्रवाहाच्या बाबतीत कोणते प्रश्न आहेत हे लक्षात घेऊन मनुष्यशक्तीनुसार अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या सरस्वतीनगर येथील कृषी महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या चरित्रगं्रथाचे प्रकाशन व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी सहस्त्रबुद्धे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, पूर्वीच्या काळी असलेल्या समस्यांचा आज निचरा झालेला नाही. देशाने, राज्याने परिवर्तनाचा अनुभव घेतला असून, राजकीय कामातून परिवर्तन होणे गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी यांच्यातून मतदारांचे अभिमत निर्माण होते; मात्र आज कोणतीही संस्था मतदारांचे प्रशिक्षण करीत नाही. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या कार्यक्षेत्रातील तफावत लक्षात आणून दिली तर प्रश्न सुटतील. ६५ वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या व्यवस्थेत विशेष बदल झालेला नाही. काळ बदलल्याने नव्या पिढीची रचना करावी लागणार आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या निधीचा वापर कसा होतो, अनेकांचा निधी वापरला जात नाही. त्यामुळे मतदारांना वाटते, लोकप्रतिनिधींनी कामे केली नाहीत. आमदार, लोकप्रतिनिधी व मतदारांनी सजग राहावे.
व्यासपीठावर मविप्रच्या नीलिमा पवार, आमदार सीमा हिरे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राजाभाऊ वाजे, कुलगुरु अरुण जामकर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, लक्ष्मण सावजी, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुरेशअण्णा पाटील, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रा. राहुल पाटील, अनिल कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. के. एस. बंदी यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन नंदन रहाणे यांनी केले.
कार्यक्रमाला निशिगंधा मोगल, माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, प्राचार्य संतोष वाघ, डॉ. एस. एम. हाडोळे, एस. पी. क्षीरसागर, डॉ. बी. व्ही. कर्डिले, पी. टी. कडवे उपस्थित होते. (वार्ताहर)