‘खैर’ तस्करीप्रकरणी मोक्का लावावा; ‘मास्टरमार्इंड’च्या मुसक्या आवळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 09:02 PM2017-10-30T21:02:09+5:302017-10-30T21:03:16+5:30
वनविभागाच्या कर्मचार्याची मेहेरनजर व स्थानिक नागरिकांपैकी काही नागरिकांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे खैरची तस्करी याभागातून थेट गुजरातपर्यंत केली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने दहा तारखेला वृत्त प्रसिध्द करुन धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले
नाशिक : मालेगाव उपवनविभागातील ९० हेक्टरवरील जंगलामध्ये खैर तस्करतोडीप्रकरणी मालेगावकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खैर तस्करीप्रकरणी ‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीकडून मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळून सर्व संशयितांवर मोक्कान्वये कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव तालुक्यातील गाळणे, नागझिरी, चिंचवे, शिंदवाडी, विराणे, पोहाणे, रामपुरा आदि भागातील जंगलात मागली महिन्यामध्ये खैर प्रजातीच्या चारशेहून अधिक वृक्षांवर इलेक्ट्रिक कटर फिरविण्यात आला. वनविभागाच्या कर्मचार्याची मेहेरनजर व स्थानिक नागरिकांपैकी काही नागरिकांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे खैरची तस्करी याभागातून थेट गुजरातपर्यंत केली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने दहा तारखेला वृत्त प्रसिध्द करुन धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आणि मुख्य वनसंरक्षकांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, एक संशयित बाबुराव राऊत यास ताब्यात घेण्यात आले असून त्याची कोठडी मंगळवारी (दि.३१) संपत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, मालेगावकरांमध्येही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून चिंचवे, गाळणेपासून तर मुख्य मालेगाव शहरातील सामाजिक संघटनांकडूनही खैर तस्करीमध्ये गुंतलेल्या वन कर्मचार्यासह संशयित आरोपी व मास्टरमार्इंडच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे. ‘आम्ही मालेगावकर...’ संघटनेने सर्व दोषी आढळणार्या संशयितांवर मोक्कान्वये कारवाईची मागणी मुख्य वनसंरक्षकांसह उपविभागीय वनधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकार्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर निखील पवार, यशवंत खैरनार, देवा पाटील आदिंच्या स्वाक्षºया आहेत.