सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:38+5:302021-06-25T04:12:38+5:30
पाच वर्षांपूर्वी झालेल्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाइस) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर संचालक मंडळात गटबाजीच्या अनेक ...
पाच वर्षांपूर्वी झालेल्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाइस) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर संचालक मंडळात गटबाजीच्या अनेक घडामोडी निर्माण झाल्या होत्या. नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आल्यानंतर संचालकांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी उभी फूट पडली होती. त्यानंतर नामकर्ण आवारे यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण चव्हाणके, प्रभाकर बडगुजर, संदीप आवारे, पद्मा सारडा, सी. पी. पगारे या सहा संचालकांनी स्टाइसच्या पदाचा राजीनामा दिल्याने पेच निर्माण झाला होता.
संचालक मंडळाच्या १२ पैकी सहा संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ अ (५) मधील तरतुदीनुसार एकूण संचालक सदस्य दोन तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे ८ सदस्य पदावर कार्यरत नसल्याने समिती रचनेत दोष निर्माण झाल्याचे उपसचिवांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे संस्थेवर उर्वरित सदस्य निष्प्रभावित करून प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सहकार विभागाचे श्रेणी परीक्षक श्रेणी- २ चे संजीव त्र्यंबक शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
फोटो- स्टाइस ऑफिस