कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक, २ पोलीस अधिकाऱ्यांना दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:06 PM2020-04-14T18:06:26+5:302020-04-14T18:09:02+5:30
या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.
नाशिक - महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मालेगावमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी आयएएस अधिकारी पंकज आशिया या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली आहे. पंकज आशिया यांनी जबाबदारी हाती घेताच दोन पोलीस उपाधीक्षकांना दणका दिला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात संचारबंदी लागू असूनही नागरिक रस्त्यावर फिरतात कसे? असा प्रश्न नोटीसद्वारे या दोन पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे उत्तर २४ तासात सादर करण्याचाही आदेश त्यांना देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न केल्यास या दोन्ही पोलीस उपाधिक्षकांना शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मालेगावात २४ तासात १८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.