आरोग्य केंद्रांवर ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 07:24 PM2019-08-28T19:24:35+5:302019-08-28T19:26:14+5:30
वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे एमबीबीएस ऐवजी बीएएमएसमधून भरण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेने बीएएमएस उमेदवारांकडून मागविलेल्या अर्जानुसार गुणवत्तायादीतील ८९ वैद्यकीय अधिकाºयांना रिक्त असलेल्या जागांवर तात्काळ नियुक्ती दिली आहे. या अधिकाºयांना येत्या दोन दिवसात नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सुचना प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिल्या.
वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांकडून ग्रामीण व अति दुर्गम भागात सेवा देण्यासाठी शासकीय नोकरी पत्करण्याऐवजी खासगी प्रॅक्टिसकडे अधिक कल असल्याने गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून अनेकांनी फारकत घेतली. परिणामी जिल्ह्यातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ८८हून अधिक वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त झाली होती. जे काही वैद्यकीय अधिकारी शिल्लक राहिले त्यांच्यामार्फत अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावून घेण्यात येत होती. यासर्व बाबी शासनाला अवगत केल्यानंतर एमबीबीएस ऐवजी बीएएमएस उमेदवारांची नियुक्ती करण्यात शासनाने हिरवा कंदील दिला. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने रिक्त ८८ जागांसाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात वृत्तपत्रातून जाहिरात दिली असता, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ४८५ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी केल्यानंतर गुणवत्तेनुसार ४४७ उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली. गुणवत्ता यादीवर सुमारे ४० हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची पुर्तता करून मंगळवारी त्यातील २०० उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात थेट मुलाखतींसाठी बोलविण्यात आले होते. त्यातील ८९ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्त्या देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्ती पत्र देवून परस्पर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हजर होण्याच्या सुचना दिल्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत.