जिल्हा परिषदेत अनुकंपावर ६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 08:23 PM2019-12-03T20:23:00+5:302019-12-03T20:23:48+5:30
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला जिल्हा परिषदेचा अनुकंपातत्त्वावरील कर्मचारी भरतीची प्रक्रिया मंगळवारी प्रशासनाने पूर्ण केली. जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या जागांच्या २० टक्के जागा भरण्यास शासनाने अनुमती दिल्याने ६२ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून तत्काळ त्यांना समुपदेशाने नियुक्ती देण्याची कार्यवाही एकाच दिवसात पूर्ण झाल्याने अनुकंपा उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केले होते. तथापि, शासनाने सर्व प्रकारच्या कर्मचारी भरतीवर निर्बंध लादल्याने अनुकंपा भरतीला हिरवाकंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळण्याच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा धीर सुटत चालला होता. यातील काहींची वयोमर्यादा संपुष्टात येण्याची चिन्हे होती, तर हमखास नोकरी मिळण्याच्या अपेक्षेमुळे दुस-या नोकरीसाठी प्रयत्न करण्यातही अडचणी निर्माण होत होत्या. राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी अनुकंपातून रिक्त जागा भरण्याची अनुमती जिल्हा परिषदांना दिली असली तरी, त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाने स्वतंत्र वेगवेगळे शासन आदेश जारी केल्यामुळे प्रशासनापुढे संभ्रम निर्माण झाला होता. रिक्तपदांच्या तुलनेत वीस टक्के जागा अनुकंपातून भरण्याची मुभा देताना शासनाने मात्र अनुकंपाची सेवाज्येष्ठता यादी न डावलण्याचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे प्रशासनापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी शासनाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले. परंतु अद्याप शासनाने त्यास होकार कळविलेला नाही. असे असले तरी, अनुकंपा उमेदवारांचा वाढता दबाव पाहता, प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ६३ कर्मचा-यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी पात्र ठरू पाहणा-या कर्मचा-यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व दुपारनंतर या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येऊन जिल्ह्यातील रिक्त असलेल्या जागांवर समुपदेशनाने नेमणुकाही करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.