महासभेत होणार शिक्षण समिती सदस्यांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:54 PM2020-01-16T23:54:09+5:302020-01-17T01:13:01+5:30
नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेची नवीन वर्षाची पहिलीच महासभा शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. या महासभेवर शिक्षण समितीवर सदस्य निवडीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर नाशिक महापालिकेसाठी वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा करण्यासंदर्भातील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेची नवीन वर्षातील पहिली महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या महासभेत मागील महासभेतील तहकूब ठेवण्यात आलेल्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यात प्रामुख्याने नाशिक महापालिकेतील शिक्षण समितीवर नऊ सदस्य निवड करणे, महापालिका शिक्षण विभागाकडून के. जी. ते बारावीपर्यंत सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, वृक्ष गणनेच्या कामाच्या मुदतवाढीस तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या उपक्रमांतर्गत शहरी उपजीविका केंद्र उभारणीकामी जागा निश्चत करणे आदींसह विकासकामांवर निर्णय होणार आहे.
सदगीरचा गौरव करावा
महासभेवर ठेवण्यात आलेल्या विषयात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांचा विशेष गौरव करून त्याची महापालिकेचे ब्रॅन्ड अम्ॅबेसेडर म्हणून नेमणूक करावी, अशी मागणीही सदस्यांकडून करण्यात आली.