‘एक’ अधिकारी अखेर रजेवर बेकायदेशीर अधिकारी नियुक्ती प्रकरण
By admin | Published: December 12, 2014 01:41 AM2014-12-12T01:41:31+5:302014-12-12T01:44:23+5:30
‘एक’ अधिकारी अखेर रजेवर बेकायदेशीर अधिकारी नियुक्ती प्रकरण
नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दोघा अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी अचानक रजेवर गेल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तसेच दुसऱ्या अधिकाऱ्यालाही प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीबाबत विचारणा केल्याचे समजते. विशेष म्हणजे यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या दोन विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला माहिती मागवून कोंडीत पकडण्याची खेळी केल्यानेच या दोघांपैकी एक अधिकारी कालपासून अचानक रजेवर गेल्याचे कळते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयातील १४ कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार करून वरीष्ठ अधिकाऱ्याच्या मानसिक छळामुळे मनस्ताप होत असल्याचे कळविले होते. त्यातच एका विद्यमान महिला पदाधिकाऱ्याच्या पतीराजाने तक्रार असलेल्या अधिकाऱ्याचीच मुळात नियुक्ती कायदेशीर नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दुसरीकडे १४ कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीची दखल घेऊन संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याकडून प्रशासनाने खुलासा मागविल्याचे कळते. गेल्या काही वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात हेच दोन्ही अधिकारी सर्वेसर्वो झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी केलेली असतानाच आता कर्मचाऱ्यांनही बंड पुकारल्याने जिल्हा परिषद प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वीच या विभागातील काही संगणक व साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. चोरीस गेलेल्या संगणकात अपहार व भ्रष्टाचाराची प्रकरणे व माहिती असल्यानेच रातोरात हे संगणक चोरीस गेल्याने बराच गदारोळ झाला. मात्र याप्रकरणाची चौकशीही नेहमीप्रमाणे बासनात गुंडाळण्यात आल्याचे समजते. (प्रतिनिधी)