नाशिक बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 02:00 AM2022-03-25T02:00:51+5:302022-03-25T02:03:06+5:30
नाशिक बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक म्हणून नाशिक तालुका सहकार उप निबंधक फय्याज मुलानी यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केले.
नाशिक : नाशिक बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक म्हणून नाशिक तालुका सहकार उप निबंधक फय्याज मुलानी यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याबाबत उच्च न्यायालयाने ३ मार्च रोजी सहकार विभागाला आदेश दिले होते. २१ दिवसांच्या आत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक वा प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आल्याने गुरुवारी (दि. २४) न्यायालयाच्या आदेशान्वये तीन आठवड्यांची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार जिल्हा निबंधक सतीश खरे यांनी उच्च न्यायालयाचे आदेश व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्राची दखल घेत बाजार समितीवर प्रशासक म्हणून फय्याज मुलानी यांची नेमणूक केली आहे. नाशिक बाजार समितीच्या संचालकांची मुदत मार्च २०२१ मध्येच संपुष्टात आली असली तरी, कोरोनामुळे सहकार विभागाने सर्वच बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ दिली. त्यामुळे संचालकांना एक वर्ष कामकाज करण्याची संधी मिळाली. संचालकांची मुदत संपल्याने बाजार समिती बरखास्त करावी व प्रशासक नेमावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवाजी चुंभळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती. तिची सुनावणी होऊन न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला होता. आता बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने लवकरच निवडणुकीचा मार्गही मोकळा होणार आहे.