प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती
By admin | Published: June 23, 2017 12:34 AM2017-06-23T00:34:03+5:302017-06-23T00:34:16+5:30
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत रेट्रोफिटिंग, ग्रीनफिल्ड आणि पॅनसिटी याबाबत विविध प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे, आता मोठ्या प्रकल्पांचे सुकाणू सदर संस्थेच्या हाती जाणार आहेत. दरम्यान, बैठकीत कंपनी सचिवांसह तीन अधिकाऱ्यांच्याही निवडीस मान्यता देण्यात आली.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची तिसरी बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात झाली. यावेळी, स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सल्लागार संस्थेसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात क्रिसील, टीसीएस, आयलो, के.पी.एम.जी. यांसह पाच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तांत्रिक आणि आर्थिकदृष्टीने निकष पाहून संचालक मंडळाने अखेर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टिनॅशनल संस्थेच्या नियुक्तीवर मान्यतेची मोहोर उमटवली. याशिवाय, कंपनीसाठी आवश्यक असलेल्या पदांच्या निवडीलाही मान्यता देण्यात आली. त्यात, कंपनी सचिव म्हणून महेंद्र शिंदे, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख म्हणून प्रमोद गुर्जर तर मुख्य लेखाधिकारी बाबुराव निर्मळ यांचा समावेश आहे. मुख्य अभियंता स्थापत्य आणि शहर रचनाकार या पदांसाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी बोलाविण्यासही संमती देण्यात आली. कंपनीसाठी आवश्यक पदनिर्मिती झाल्याने आता खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीच्या कामांना गती येणार असल्याचे सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.