नियुक्ती नियमानुसार : बाजार समिती संचालकांकडून बिनबुडाच्या आरोपाची तक्रार सभापती-संचालकाच्या वादात सचिवाची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:06 AM2018-02-11T01:06:27+5:302018-02-11T01:06:54+5:30
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे व संचालक शंकरराव धनवटे यांच्यात शुक्रवारी झालेल्या वादात बाजार समितीच्या सचिवाने उडी घेतली.
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे व संचालक शंकरराव धनवटे यांच्यात शुक्रवारी झालेल्या वादात बाजार समितीच्या सचिवाने उडी घेतली असून, सहकार खात्याने नियमानुसारच आपली नियुक्ती केलेली असताना काही संचालक खोटे आरोप करून तक्रारी करीत असल्याचे स्पष्टीकरण सचिव अरुण काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे. काळे यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी बाजार समितीच्या संचालकांची बैठक सुरू होण्यापूर्वीच धनवटे यांनी सभापतींकडे मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची मागणी केली व सचिव अरुण काळे यांना रुजू का करून घेतले, अशी विचारणा केली. चुंभळे व धनवटे यांच्यातील वादानंतर धनवटे यांनी प्रोसिडिंग बुकावर सही न करता निघून गेले व त्यानंतर सभेचे कामकाज व्यवस्थित पार पडले, अशी वस्तुस्थिती नमूद करून काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाच्या सचिव पॅनलमधील मी उमेदवार असून, नामतालिकेवरून माझी बाजार समितीच्या सचिवपदी नेमणूक झालेली आहे. परंतु माझ्यावर चुकीचे आरोप करून मला कायदेशीर काम करू दिले जात नाही, यापूर्वी मला दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते, त्यावर आपण जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केल्याने त्यांनी सचिवपदावर पूर्ववत रुजू करून घेण्याचे आदेश दिल्याने मी रुजू झालो. त्यानंतर मात्र पुन्हा संचालक मंडळाने काहीही कारण नसताना पुन्हा माझे अधिकार काढून प्रभारी सचिवांकडे माझा पदभार सोपविला. त्यावर मी पुन्हा जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली असता त्यांनी तीन दिवसांच्या आत पुन:श्च सचिवपदी नियुक्तीचे आदेश दिले.