कोनांबे, वडझिरेसह सिन्नरच्या दहा गावांवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:32+5:302021-03-23T04:15:32+5:30
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे, वडझिरेसह सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी विशेष पात्र झालेल्या दहा गावांचा ऑनलाइन ...
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे, वडझिरेसह सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी विशेष पात्र झालेल्या दहा गावांचा ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अभिनेते अमीर खान यांच्यासह मान्यवरांनी गौरव करीत त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली.
पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील १९ गावांनी सहभाग घेतला आहे. त्यातील १० गावांनी ठराविक मुदतीत विशेष कामगिरी करीत दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एकमेव सिन्नर तालुक्यातील ही गावे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात या दहा गावांचा सन्मान केला जाणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अभिनेते अमीर खान, कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख, किरण राव, डॉ. अविनाश पोळ, सत्यजित भटगळ यांच्यासह मुख्य सचिव व अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या गावांना सहभागी करून त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील कोनांबे, वडझिरे या गावांसह दहा गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जलमित्र व ग्रामस्थ या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी या गावातील पदाधिकाऱ्यांचे पानी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करण्यासह आणखी चांगले काम करण्याचे प्रोत्साहन दिले.
कोनांबे येथील माजी सरपंच संजय डावरे आणि त्यांना गावच्या विकासांसाठी साथ देणारे त्यांची पानी फाउंडेशनची टीम आणि गावातील जलमित्र गेल्या तीन वर्षांपासून कोनांबे गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशाच माध्यमातून याही वर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेमधून भाग घेऊन कोनांबे गाव समृद्ध गाव स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. कोनांबे येथील पानी फाउंडेशनच्या कामाची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दखल घेऊन अटल भूजल योजनेमध्ये आपल्या कोनांबे गावचा समावेश करण्यात आला आहे.
---------------------
मुख्यमंत्र्यांकडून या गावांचा केला सन्मान
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पानी फाउंडेशन यू-ट्यूब लिंकवर व वृत्तवाहिनीवर या गावांचा गुणगौरव सोहळा पार पडला. कोनांबे, धोंडबार, वडझिरे, चंद्रपूर, कुंदेवाडी, हिवरे, घोरवड, रामपूर, पाटपिंप्री, चास या गावांचा या ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.