ड्रायव्हिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा
By admin | Published: June 1, 2016 10:45 PM2016-06-01T22:45:20+5:302016-06-01T23:13:47+5:30
आमदार देवयानी फरांदे : प्रशिक्षणार्थींचा सन्मान
नाशिक : कुठलाही सन्मान हा पद किंवा पैशामुळे मिळत नाही, तर ज्या क्षेत्रात आपण कार्यरत असतो त्या क्षेत्रात किती समर्पण भावनेने काम करतो, यावर अवलंबून आहे. ड्रायव्हिंग हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. अनेक जणांचे जीव चालकाच्या हातात असतात त्यामुळे या पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, असे मत आमदार देवयानी फरांदे यांनी नेक्स्ट एज्युकेशन सोसायटीतर्फे राबविण्यात आलेल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग अभियानातील प्रमाणपत्र वितरण समारंभात व्यक्त केले.
आमदार फरांदे यांनी आयोजकांतर्फे चालविण्यात येत असलेला उपक्रम स्तुत्य असून, अशा उपक्रमांचा निश्चितच तळागाळातील प्रशिक्षणार्थींना उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींनी विविध कौशल्ये आत्मसात करायला हवी, असे आवाहनही फरांदे यांनी यावेळी केले.
ड्रायव्हिंग ट्रेनिंग अभियानांतर्गत बेरोजगार तसेच ड्रायव्हिंग क्षेत्रात करू इच्छिणाऱ्या गरजू व्यक्तींना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या ८७ प्रशिक्षणार्थींना यावेळी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी रश्मी ठाकूर, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील आणि नेक्स्ट एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष वैशाली जैन यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.