वीज देयके माफी, जनावरांना चारा द्या

By admin | Published: December 19, 2015 10:53 PM2015-12-19T22:53:27+5:302015-12-19T23:04:23+5:30

दुष्काळ पाहणी दौरा : शिष्टमंडळासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या अनेक व्यथा

Appropriate power payments, give food to the animals | वीज देयके माफी, जनावरांना चारा द्या

वीज देयके माफी, जनावरांना चारा द्या

Next

सिन्नर : सलग पाच वर्षांपासून विहिरींना पाणी नसताना हजारो रुपयांची वीज देयके येतात, पाण्याचा टॅँकर वेळेवर व नियमित येत नाही, माणसांना प्यायला पाणी मिळते मात्र जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू असताना गावचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नाही आदिंसह विविध व्यथांचा पाढा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यापुढे वाचला. दुष्काळी परिस्थितीत शासनाने वीज देयके माफ करावी व कर्जमाफीचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी पथकासमोर केली.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, छावाचे विलास पांगारकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर, सायाळे व मिठसागरे या गावांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर यांच्यासह वीज वितरण, पाटबंधारे, शिक्षण, वनविभाग आदिंसह सर्वच खात्याचे अधिकारी सहभागी झाले होते.
धोंडवीरनगर येथून दुष्काळ पाहणी दौऱ्यास प्रारंभ झाला. महसूल पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विचारण्यासह राज्यमंत्री राठोड यांनी ग्रामस्थांना विविध प्रश्न विचारून गावात शासकीय योजना पोहचतात की नाही, याची माहिती जाणून घेतली. यावेळी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे महिलांनी सांगितले. महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून टॅँकर सुरू करण्यास दिरंगाई केली जात असल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. जनावरेही पिणार नाही असे पाणी असलेल्या विहिरीतून पाणी घेण्याचा आग्रह केला जात असल्याची तक्रार माहिलांनी केली. अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पाणी पाहणी दौऱ्याच्या चक्रव्यूहात गावे कासावीस झाल्याची तक्रार उदय सांगळे यांनी केली. अधिकाऱ्यांनी टॅँकरचा प्रस्ताव मंजूर करताना वास्तव परिस्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन सांगळे यांनी केले. त्यानंतर महसूल राज्यमंत्री राठोड यांनी तातडीने धोंडवीरनगर गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर मंजूर करण्याचे आदेश प्रातांधिकारी मंगरुळे यांना केले. यावेळी कोनांबे पूर चारीचे रखडलेल्या कामाच्या व अपूर्ण नळपाणीपुरवठा योजनेच्या तक्रारी ग्रामस्थांनी राठोड यांच्याकडे केल्या.
त्यानंतर सायाळे येथे महसूल राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी कोरड्याठाक व दूषित पाणी असलेल्या विहिरी दाखविल्या. नीळवंडे धरणातून प्रस्तावित असलेल्या चाऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सहकार्य करण्याची मागणी विजय शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली. चार वर्षांपासून सायाळे गावास पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू असताना गावाचा समावेश जलयुक्त शिवारात का करण्यात आला नाही, असा सवाल बाजार समितीचे संचालक सुधाकर शिंदे यांनी उपस्थितीत केला. यावेळी शेतकऱ्यांनी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. माणसांना पाणी मिळते मात्र जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. मिठसागरे येथे सरपंच अ‍ॅड. शरद चतुर यांनी गाव व परिसरात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला. वीज देयक माफी, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महसूल राज्यमंत्री राठोड व आमदार वाजे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे गावोगावी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतकरी अतिशय पोटतिडकीने दुष्काळाची दाहकता मांडत होते. दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे राठोड यांनी सांगितले. सामान्य माणसाला केंद्रबिंदू करून जे करण्याजोगे आहेत ते करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे राठोड म्हणाले. चारा डेपो व टॅँकर सुरू करण्याची तयारी शासन करीत असल्याचे राठोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण आलो असून, पक्ष शेतकऱ्यांसोबत असल्याचे राठोड यांनी धोंडवीरनगर, सायाळे व मिठसागरे येथे सांगितले.
टॅँकरने पाणीपुरवठ्याची मागणी
ब्राह्मणगाव : येथील गव्हाळी पांदी शिवारातील विहिरी आटल्याने पिण्याच्य पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा करावा तसेच कुपनलिका खोदावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने गव्हाळी पांदी, डोंगर परिसर, धांद्री पांदी शिवारात डिसेंबरमध्येच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. शिवारात पिण्याच्या पाण्याचे, जनावरांना पाण्याचे व चाऱ्याचे संकट घर करू लागले आहे. पाण्याअभावी शेती सोडून द्यावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी कांदा रोपे शिरपूर, धुळे तालुक्यांमध्ये लागवडीसाठी दिली आहेत. झालेली कांदा लागवड हाती येईलच
याचीही खात्री देता येत नसल्याने संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Appropriate power payments, give food to the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.