मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:38 PM2019-12-25T17:38:05+5:302019-12-25T17:40:19+5:30
सिन्नर : आखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजूरी देण्यात आली.
२०२० मध्ये होणारे ६० वे शैक्षणिक संमेलन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या सहकार्याने ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात येणार असल्याचे ठरले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, मारुती खेडकर, दीपक बोंदवल, नंदकुमार बारगावकर यांना पत्र देऊन परवानगी घेण्यात आली. वर्धा येथील ऐतिहासिक अधिवेशनासाठी नाशिक जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त मुख्याध्यापक उपस्थित होते. जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रशील अशा १९ मुख्याध्यापकांचा राज्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आली. माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कुलपती वेदप्रकाश मिश्रा, माजी खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, किशोर दराडे, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, विकास ठाकरे, पंकज भोयर, रणजीत कांबळे, बाळाराम पाटील यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निकष समितीचा शिफारशींची अंमलबजावणी करावी, सेवक निश्चितीचे व दुरुस्तीचे अधिकार शिक्षकांना द्यावेत, सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी दूर करुन मुख्याध्यापकांना सातव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी यांच्यासह १९ मागण्यांचा ठरावात समावेश आहे.