अडीच कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By admin | Published: March 4, 2017 12:24 AM2017-03-04T00:24:36+5:302017-03-04T00:25:21+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेचा दोन कोटी ५५ लक्ष ५० हजार ९४१ रु. चा शिलकी अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणेकामी ३० लाख या कामाव्यतिरिक्त कोणत्याही विकासकामांचा समावेश नसलेला त्र्यंबक नगरपालिकेचा दोन कोटी ५५ लक्ष ५० हजार ९४१ रु. चा शिलकी अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या़
सन २०१४-१५, १५-१६ या दोन वर्षी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांची तरतूद करण्यात आली होती. सिंहस्थ कुंभमेळा संपला आणि कामेही संपली. त्र्यंबकेश्वर शहर विकासाची बरीचशी कामे शासनाने विविध शासकीय यंत्रणांना दिलेल्या अनुदानातून कामे करण्यात आलीत. त्यामुळे रु टीन कामांच्या व्यतिरिक्त सन २०१७-१८ साठी तसे पाहता फारसे कामच उरले नाही. तरीदेखील येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी १० लाख, ठेका कर्मचारी ५० लाख, या वर्षात अतिक्रमणावर भर देण्यात येणार असल्याने १० लाखांची तरतूद करून ठेवली आहे. गेल्या २० वर्षांपासून शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अडकला आहे. यावर्षी तरी मंजुरी मिळेल असे गृहीत धरून पुतळा उभारण्यासाठी ३० लाखांची तरतूद करून ठेवली आहे. अर्थात ही तरतूद गेल्या २० वर्षांपासून मागील पानावरून पुढे...अशी केली जात आहे. सुजल निर्मल पाणीपुरवठा १० लाख, अग्निशमन आराखडा अनुदान खर्च १५ लाख, दलितवस्ती अनुदान अनुदान खर्च ६० लाख, प्रधानमंत्री आवास योजना ५ लाख, रमाई घरकुल योजना १७ लाख. प्राथमिक सुविधांसाठी १ कोटीची तरतूद करून ठेवली आहे. अर्थात या सर्व तरतुदी करून ठेवल्या आहेत, पण त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. यावर्षी पालिकेने जागा भाडे, गाळा भाडे यात दुप्पट वाढ केली असून, डिपॉझिटमध्येही वाढ केली आहे. काही गाळामालक आपले गाळे पोटभाड्याने आपले गाळे देतात म्हणून हा उपाय करण्यात आला असावा. येत्या आर्थिक वर्षापासून (दि.१एप्रिल) जागा भाडे सरसकट १५ टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित करामध्ये १०० रुपये विशेष स्वच्छता कर यापूर्वीच आकारला जात आहे. तर स्पे. पाणी पट्टीतही २०० रुपयांची वाढ मागील वर्षी केली आहे. तथापि जागा भाडे वगळता अन्य कोणतीही भाडेवाढ पालिकेने या अर्थसंकल्पात केलेली नाही.