मालेगाव मनपाच्या ४५४.२८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:15 AM2021-03-31T04:15:01+5:302021-03-31T04:15:01+5:30
मंगळवारी महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन अंदाजपत्रकीय सभा पार ...
मंगळवारी महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन अंदाजपत्रकीय सभा पार पडली. प्रशासनाने करवाढ न करता तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून कोरोना रोखण्यासाठी ११ कोटींची स्वतंत्र तरतूद करून ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला गेल्या २५ फेब्रुवारी रोजी सादर केले होते. त्यानंतर ३ मार्चला स्थायी समितीने किरकोळ मनपा शाळा व इमारत भाडे, मनोराधारकांकडील वसुली, अग्निशमन दलाची शुल्कवाढ अशी वाढ सुचवित ४५४.२८ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. स्थायी समितीने सादर केलेले अंदाजपत्रक मंगळवारी महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. महासभेच्या प्रारंभी नगरसेवक रशिद शेख यांनी महापौर ताहेरा शेख यांना अंदाजपत्रकात किरकोळ फेरफार बदल करण्याचा अधिकार देत अंदाजपत्रक मंजूर करावे, अशी सूचना मांडली. या सूचनेवर महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद, मुस्तकिम डिग्निटी व एमआयएमचे डॉ. खालिद परवेझ यांनी आक्षेप घेत अंदाजपत्रकावर चर्चा करावी, अशी मागणी केली. ऑनलाईन सभेत गदारोळ झाला. मुस्तकिम डिग्निटी यांनी उपसूचना मांडली. महापौर शेख यांना फेरफार करण्याच्या अधिकारावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी अधिकार देण्याच्या बाजूने ४८ मते मिळाली, तर विरोधात केवळ ११ मते मिळाली. महापौर शेख यांनी अंदाजपत्रक मंजूर केल्याची घोषणा केली.