मविप्रच्या ८०१ कोटी ९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:35+5:302021-09-09T04:19:35+5:30
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या तब्ब्ल ८०१ कोटी ९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला वार्षिक सर्वसाधारण सभेत ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या तब्ब्ल ८०१ कोटी ९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मंजुरी दिली असून संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे डिजिटलायझेशनसह सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, फलोत्पादनशास्त्र महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, रात्र महाविद्यालय, मूकबधिरांसाठी महाविद्यालय व महिला महाविद्यालय उभारण्याच्या भविष्यातील योजना संचालक मंडळाने सभासदांसमोर मांडल्या.
मराठा विद्या प्रसारक समाजाची शतकोत्तर सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ८) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात डॉ.तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेचे प्रास्ताविक करताना प्रास्ताविकात सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदांसमोर वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडतानाच घटनादुरुस्तीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याबाहेरही संस्थेला विस्तार करणे शक्य होणार असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळात दोन महिलांना प्रतिनिधित्व, आजीव सभासद व सेवक सभासद शुल्कात २०० रुपयांवरून ५००० रुपयांची वाढ, संस्थेच्या सेवेत असणाऱ्या सेवकाला कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद अथवा पदाधिकारी राहता येणार नसल्याच्या अटींचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संस्थेचा आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील आढावा सादर करतानाच त्यांनी सभासदांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. यात प्रामुख्याने सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी गटाने केलेले आरोप खोडून काढत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सभासदांसमोर उत्तरे दिली. यावेळी चिटणीस डॉ.सुनील ढिकले, उपसभापती राघो अहिरे, संचालक भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, नाना महाले, प्रल्हाद गडाख, डॉ.प्रशांत देवरे, रायभान काळे, हेमंत वाजे, अशोक पवार, डॉ.विश्राम निकम, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, उपस्थित होते.
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे, गैरकारभाराचे पुरावे द्या
मविप्र संस्थेने कोविडकाळातही प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला असल्याचे नमूद करतानाच विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे नीलिमा पवार यांनी संस्थेच्या सभासदांसमोर स्पष्ट केले. आपल्याकडून गैरकारभार होत असेल तर त्याचे आरोप करणारांनी पुरावे सादर करायला हवेत. ते नसले तर आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे नमूद करताना कोणीही संस्थेची बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाकाळात शाळा व महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. तब्बल १०० कोटींची फी येणे बाकी असतानाही संस्थेने सेवक कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले नाही. तसेच कर्मचारी कपात केलेली नाही. एवढेच नव्हे तर संस्थेने अनेक शाखांचे बांधकामे पूर्ण करत प्रगतीचा आलेख उंचावताच ठेवल्याचेही संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी वार्षिक सभेत स्पष्ट केले.
080921\08nsk_31_08092021_13.jpg
मविप्रच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. तुषार शेवाळे, समवेत सरचिटणीस निलिमा पवार, डॉ.सुनील ढिकले, राघो अहिरे, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, उत्तम भालेराव आदी