पालखेड डावा कालवा दुरुस्ती प्रस्तावास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:48 PM2021-02-02T20:48:14+5:302021-02-03T00:07:18+5:30
नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नारंगी-सारंगी प्रकल्पाच्या सोबत पालखेड डाव्या कालव्यावरील खरीप कालवाअंतर्गत असलेल्या क्रमांक ४६ ते ५२ वितरिकांना पाणी द्यावयाचे झाल्यास कालव्याच्या ११० किमीला कमीत कमी २२९ क्यूसेक इतकी पाण्याची आवश्यकता असते. सद्य:स्थितीत आवर्तन कालावधीत ११० किमीला फक्त १२० क्यूसेकइतकीच कालव्याची वहनक्षमता असून, त्यामुळे ४६ ते ५२ वितरिकांचे सिंचन चालू असताना नारंगी प्रकल्पात १२८ किमीला पाणी देणे शक्य होत नाही. नारंगी धरणात पाणी देण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो व कालव्याचा वहनव्यय वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता कालव्यावरील सर्व रब्बी, खरिपाचे सिंचन व तसेच वेळेमध्ये नारंगीला कमी कालावधीत पाणी देता यावे व कालव्याचा वहनव्यय कमी व्हावा यासाठी कालवा नूतनीकरणाची कामे करणे अत्यंत आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर १००० हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. या कामाकरिता दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ३८ कोटी २ लाख इतका निधी मंजूर झाल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
वहन क्षमता सुधारण्यासाठी दुरुस्ती
सन १९८०-८२ च्या काळात येवला तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याची लांबी वाढवून तो १२८.५० किमी पर्यंत वाढवण्यात आला. शिवाय वितरिका क्रमांक ४६ ते ५२ याद्वारे खरीप सिंचन करण्यासाठी व तसेच खरीप हंगामात नारंगी-सारंगी धरण भरून देणेसाठी तो तयार करण्यात आला होता. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प, ता.वैजापूर जि. औरंगाबाद, या धरणात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून खरीप हंगामात डाव्या तट कालव्याव्दारे २०० दलघफू पाणी सोडण्यात येते. या कालव्याची वहनक्षमता कमी झाल्यामुळे नारंगी-सारंगी धरण भरण्यासाठी सद्य:स्थितीत ५८ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी व कालव्याची वहनक्षमता सुधारण्याकरिता कालवा दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढून कमीत कमी कालावधीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.