नदीजोड प्रकल्पास सप्टेंबरअखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:36+5:302021-05-20T04:14:36+5:30
सिन्नर : दुष्काळी भागाला सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पांतर्गत ७ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी ...
सिन्नर : दुष्काळी भागाला सुमारे तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पांतर्गत ७ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली. त्यात जलसंपदा मंत्री पाटील यांनी सप्टेंबर २०२१ पर्यंत डीपीआरचे काम पूर्ण करण्याबरोबरच या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्याचे आश्वासन आमदार कोकाटे यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
मागील सरकारच्या काळात नदीजोड प्रकल्पांतर्गत सिन्नरला वगळून मराठवाड्याला पाणी देण्याचे ठरले. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच आमदार माणिकराव कोकाटे यांनी दुष्काळी सिन्नरचा यात समावेश करण्याची मागणी केली होती. जलसंपदा मंत्र्यांनी आमदार कोकाटे यांची ही मागणी मान्य केली. कोकाटे यांनी या योजनेच्या डीपीआरमध्ये काही बदल करण्यास सुचविले. त्यानुसार नवीन डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नदीजोड प्रकल्पास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी कोकाटे यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम, नदीजोडचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, नाशिकचे अधीक्षक अभियंता नाईक, मुख्य अभियंता बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्याला पाणी देण्यास आमची हरकत नाही, मात्र सिन्नरचा बराचसा भाग अतिअवर्षणग्रस्त असून, या ठिकाणीही प्राधान्याने पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन, या योजनेला मान्यता देण्याबरोबरच कामेही तत्काळ सुरू करावी, अशी मागणी आमदार कोकाटे यांनी यावेळी केली. त्यास सप्टेंबरपर्यंत मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे.
इन्फो...
असा आहे प्रकल्प..
नदीजोड प्रकल्पाद्वारे ७.१४ टीएमसी पाणी वळविण्यात येणार असून, तो पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथून कार्यान्वित होणार आहे. दमणगंगा व वैतरणा नदीवर वाल, वाघ, कलम पाडा, दुलाची वाडी, उधळे या पाच धरणांद्वारे पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी एकूण १६५६ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे. या योजनेतून ११,४८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, औद्योगिक व इतर पाण्याचे शुद्धीकरण करून त्याद्वारे १६,८४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे प्रस्तावित आहे.
इन्फो...
नदीजोड प्रकल्पासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अनेक बाबींवर चर्चा झाली. नदीजोडमधून ७ टीएमसी पाणी सिन्नरच्या अवर्षण भागात आणण्याबरोबरच अपर कडवा धरणाच्या कामासही गती देण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. गुरुवारी पुन्हा जलसंपदा मंत्री व अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर
फोटो - १९ सिन्नर ३
नदीजोड प्रकल्पासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीप्रसंगी जयंत पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम, राजेंद्र जाधव, नाईक, बेलसरे आदी.
===Photopath===
190521\19nsk_18_19052021_13.jpg
===Caption===
नदीजोड प्रकल्पासंदर्भात जलसंपदामंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीप्रसंगी जयंत पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, जलसंपदा विभागाचे सचिव विजय गौतम, राजेंद्र जाधव, नाईक, बेलसरे आदी.