कॅन्टोंमेंटच्या अखेरच्या सभेत अनेक विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:03+5:302021-02-11T04:17:03+5:30
गुरुद्वारा रोडवरील छावणी परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सभागृहात पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर जे.एस.गोराया यांच्या अध्यक्षतेखाली अखेरची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत ...
गुरुद्वारा रोडवरील छावणी परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सभागृहात पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर जे.एस.गोराया यांच्या अध्यक्षतेखाली अखेरची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत शहरातील सर्वच व्यावसायिक संकुलांमध्ये पोलीस आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सीसीटीव्ही आवश्यक करण्यात आले. शहरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या मटण व चिकन व्यावसायिकांना आकारण्यात आलेला दंड कमी करणे, बहुप्रतीक्षित डायलेसिस युनिट कार्यान्वित करणे, शहरात शासन निर्णयानुसार वॉर्ड ५ मधील स्टेशनवाडी व वॉर्ड ७ मधील शिगवे बहुला येहते अंगणवाडी सुरू करणे, भगूर येथील रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कारवाई करणे, भूमिगत गटार योजनेअंतर्गत आठही वॉर्डात प्रॉपर्टी चेंबर निर्माण करून गटार जोडणी करणे, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सर्व कंत्राटी डॉक्टरांना एक वर्षासाठी मुदतवाढ देणे व शहराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी फायर सेफ्टी यंत्रणा बसविणे. त्यात प्रामुख्याने शाळा,लॉन्स, खासगी हॉस्पिटल, व्यावसायिक संकुले, कोचिंग क्लासेस, नर्सिंग होम व खासगी ओपीडी सेंटर यांना बंधनकारक करण्यात आली असून याकामी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी शासन नियंत्रित फी भरून कॅन्टोन्मेंट देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
शहराला पाणीपुरवठा करतांना प्रशासनाला सुमारे ५५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो त्यामुळे प्रशासनाने सुचवलेल्या दरवाढीला विरोध करून, प्रति हजार लीटरमागे ७० पैश्याची दरवाढ करण्याचा निर्णयावर सहमती देण्यात आली. तसेच अतिक्रमण व भूमिगत गटारीचे कामाचे प्रश्न, हॉस्पिटल सुविधा आदी मुख्य व गरजेच्या विषयांसह ३१ बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक प्रभावती धिवरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, बाबुराव मोजाड, मीना करंजकर, ब्रिगेडियर शक्ती वर्धन, कर्नल अतुल बिस्ट, कर्नल पुनीत संघेरा, ग्रुप कॅप्टन जे.मॅथ्यू , मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे आदी उपस्थित होते. सभेच्या शेवटी प्रशासनाच्या वतीने ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांच्या हस्ते सर्व लोकनियुक्त व लष्कर नियुक्त सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
चौकट===
मी पुन्हा येणार.....
सत्काराला उत्तर देतांना छावणी परिषदेच्या सर्वच लोकप्रतिनिधीनी ‘मी पुन्हा येणार’ अशी भूमिका जाहीर केली. गेल्या सहा वर्षात विकासकामे केल्याचे सांगत निवडणुका लढण्यासाठी कायम तयार असल्याचे सांगितले.