मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रिमंडळाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:51 AM2017-11-02T00:51:30+5:302017-11-02T00:51:35+5:30
पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयात आणून नाशिक जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाºया मांजरपाडा प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेल्या कामांच्याही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक : पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयात आणून नाशिक जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाºया मांजरपाडा प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेल्या कामांच्याही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. येवल्याचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वळण योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी खोºयांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोºयात वळविण्यासाठी भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजनांची अंतिम टप्प्यातील कामे रखडलेली होती. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी भुजबळ यांनी तुरुंगात असूनही पत्रांद्वारे तसेच विधानसभेच्या अधिवेशनात सतत पाठपुरावा केला होता. या सदर प्रवाही वळण योजनांमध्ये सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा तर दिंडोरी तालुक्यातील गोळशी महाजे, ननाशी, पायरपाडा, पिंप्रज, आंबेगाव, झालीपाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे. या प्रवाही योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयामध्ये वळवले जाणार आहे. हे पाणी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना उपलब्ध होणार असून, येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकºयांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने सदर प्रकल्पाच्या जवळच्या शेतकºयांना फायदा होऊन सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सिंचनातसुद्धा वाढ झाली आहे.
८६ टक्के काम पूर्ण
पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांच्या सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजूला गोदावरी खोºयात वळविणे असे या योजनांचे स्वरूप आहे. मांजरपाडा प्रकल्पातील ८.९६ किमी लांबीच्या बोगद्याचे ८६ टक्के तर धरणाचे व सांडव्याचे जवळपास ६५ टक्के काम पूर्ण झालेले आहे.
पोहोच कालव्याचे काम दोन वर्षांपासून बंद
उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पुणेगाव कालवा तसेच दरसवाडी पोहोच कालवा या कामांचा समावेश आहे. पुणेगाव डावा कालवा एकूण ६३ किलोमीटर लांबीचा असून, या कालव्याच्या १ ते २५ किलोमीटरमधील वाढीव विसर्गानुसार विस्तारीकरणाचे काम अपूर्ण आहे. ५० ते ६३ किलोमीटरपर्यंतच कालव्याचे क्रॉँकिटी अस्तरीकरण करण्याची नितांत आवश्यकता होती. तर दरसवाडी पोहोच कालव्याची एकूण लांबी ८८ किलोमीटर असून, त्यापैकी १ ते ४० किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. ४१ ते ८८ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पात तृतीय प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे व खर्चास निर्बंध असल्याने सदर पोहोच कालव्याचे कामे दोन वर्षांपासून बंद होते. आता या प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळाल्याने काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवाही वळण योजनांचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण होऊनसुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे किरकोळ कामे बाकी असल्याने या योजना रखडल्या होत्या. त्यातही राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्यासाठी कारणीभूत ठरला होता.
गिरीश महाजनांनी शब्द खरा ठरवला
राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेणाºया ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंगळवारी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी, नाशिक जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाºया मांजरपाडा प्रकल्पाच्या उर्वरित कामास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार बुधवारच्या बैठकीत त्यांनी दिलेला शब्द खरा ठरला.