‘स्वीकृत’च्या नियुक्त्या सप्टेंबरच्या महासभेत?
By admin | Published: July 11, 2017 06:41 PM2017-07-11T18:41:19+5:302017-07-11T18:41:19+5:30
गटनेत्यांची बैठक : २१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले
नाशिक : महापालिकेत पाच जागांवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त्या करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे मनसे वगळता सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी, कॉँग्रेस-राष्ट्रवादीनेही आपला एक सदस्य नियुक्त करावा, अशी मागणी केली. दरम्यान, आयुक्तांनी २१ आॅगस्टपर्यंत तौलनिक संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यत्वासाठी गटनेत्यांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली असून, त्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महासभेत महापौरांकडून नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीनंतर लवकरात लवकर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात यावी, असे महापालिका अधिनियमात स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून सदर प्रक्रिया रखडली होती. अखेर, नियुक्ती प्रक्रिया राबविण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीला महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी, नगरसचिव ए. पी. वाघ यांनी तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन आणि सेनेचे दोन सदस्य नियुक्त होऊ शकतात, असे स्पष्ट करत नियुक्तीची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने दोन्ही पक्ष एकत्र आल्यास एक सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी त्याबाबतचे लेखी पत्र देण्याची सूचना करत कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यासाठी मुदत मागितली असता आयुक्तांनी २१ आॅगस्टपर्यंत गटनेत्यांनी सदस्यांच्या नावांचे प्रस्ताव सादर करावेत, असे सांगितले. त्यामुळे २१ आॅगस्टपर्यंत स्वीकृत सदस्यत्वासाठी प्रस्ताव सादर केले जाणार असून, त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून अंतिम नावे महासभेला सादर केली जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या महासभेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.