देवपूर, सोमठाणेत कोविड सेंटर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:00+5:302021-05-09T04:15:00+5:30
दुसर्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला. शहरासह ग्रामीण भागात उद्रेक झाल्याने दुर्दैवाने अनेकांना प्राण गमवावे लागले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसर्या ...
दुसर्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला. शहरासह ग्रामीण भागात उद्रेक झाल्याने दुर्दैवाने अनेकांना प्राण गमवावे लागले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसर्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये, या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आमदार कोकाटे यांनी मागील आठवड्यात देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्या दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बनसोड यांच्याशी चर्चा केली. सोमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रही सध्या बंद स्थितीत आहे. तिथेही कोविड सेंटर केल्यास या केंद्राचा रुग्णांना फायदा होईल, ही बाब त्यांनी बनसोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यांनी नियोजन करून सोमठाणे व देवपूर येथे कोविड सेंटरला मंजुरी दिल्याचे कोकाटे यांनी सांगितले. दोडीत कोविड सेंटरसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांचेशी चर्चा केली. डॉ.थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोडी परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने, येथे कोविड सेंटरची गरज असल्याचे आमदार कोकाटे यांनी थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले.
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात एक टन क्षमतेचा ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात आला आहे. त्यामुळे तेथील दोन ड्युरा सिलिंडर अतिरिक्त ठरले असून यातील एक ड्युरा देवपूर तर दुसरा सोमठाणे येथील कोविड सेंटरसाठी वापरण्याबाबत आमदार कोकाटे यांनी सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे हे ड्युरा दोन्ही केंद्रांना मिळणार आहेत.
कोट....
सोमठाणे आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्यसेविका व एक शिपाई अशी पदे मंजूर असून, भरती झालेली आहे. मात्र, आरोग्य केंद्र सुरू झालेले नसल्याने अधिकारी, कर्मचारी कोरोना काळात सिन्नर येथे सेवा बजावत आहे. कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर हा स्टाफ आपल्या मूळ जागांवर काम करणार असून, आवश्यकतेनुसार कार्यकुशल आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार