स्वीकृत सदस्य निवड; भाजपाकडून दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:34 AM2017-09-24T00:34:36+5:302017-09-24T00:34:43+5:30
महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे.
नाशिक : महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. महापालिकेत तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. सदर स्वीकृत सदस्यांची निवड महापालिका निवडणुकीनंतर महिनाभराच्या आत करणे क्रमप्राप्त होते. परंतु, या निवड प्रक्रियेला विलंब लागत गेला. त्यामुळे आयुक्तांनी स्वीकृतच्या सदस्यत्वासाठी उमेदवारांचे अर्ज देण्यासाठी सेना-भाजपाला २१ आॅगस्टची मुदत दिली होती. त्यावेळी भाजपाने एक महिन्याची मुदत वाढवून मागितल्याने आयुक्तांनी दि. १५ सप्टेंबरची तारीख जाहीर केली होती. परंतु, मुदतीत एकही अर्ज सादर न करता, भाजपाने पुन्हा एकदा महिनाभराची मुदत मागितली आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र आपल्या कोट्यातील दोन सदस्यांऐवजी चार नावांची घोषणा केली आहे. त्यात शिवसेना कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका गायकवाड व महिला आघाडीच्या अॅड. श्यामला दीक्षित यांचा समावेश आहे. या चार नावांमधून दोघांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिवसेनेची यादी तयार असतानाही केवळ भाजपाच्या आग्रहास्तव ती आयुक्तांकडे सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाचही सदस्यांची निवडप्रक्रिया रखडली आहे. भाजपाच्या गोटात मात्र स्वीकृत सदस्यत्वासाठी कमालीची चुरस निर्माण झालेली आहे. स्थानिक आमदारांमध्येही या निवडीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे एकमत होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपामुळे निवडप्रक्रियेला दिरंगाई होत असल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना गटनेता विलास शिंदे आणि भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांची बैठक बोलाविली असून, त्यावेळी निवडप्रक्रियेविषयी अंतिम तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.