कळवण उपजिल्हा रुग्णालयासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:03+5:302021-04-27T04:15:03+5:30
अभोणा व सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे ...
अभोणा व सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यात कळवण उपजिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ९ रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात येत आहे. सध्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कळवण उपजिल्हा रुग्णालयासह अभोणा व सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे आमदार पवार यांनी केली होती. मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात कळवण उपजिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ९ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यासाठी १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
कळवण उपजिल्हा रुग्णालयासोबत नाशिक जिल्हा रुग्णालय, मनमाड, येवला, कळवण व चांदवड उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे.
इन्फो...
महिनाभरात होणार कार्यान्वित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात हा प्लांट कार्यान्वित होणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून प्रतिदिन नैसर्गिक स्वरूपात ८६० जम्बो सिलेंडरची निर्मिती करण्यात येऊन या रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे.
या प्रकल्पामुळे लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नसून नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा येणार खर्च कमी होणार असून कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. या प्लांटसाठी मेंटेनन्सच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. हा ऑक्सिजन प्लांट अतिशय उपयुक्त ठरणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.