४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचे एप्रिल फुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:32+5:302021-04-02T04:15:32+5:30
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना दुसरा एक लढा म्हणजे लसीकरण वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने तिसऱ्या ...
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना दुसरा एक लढा म्हणजे लसीकरण वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील कोमाॅर्बिड (व्याधीग्रस्त) नागरिकांना लस घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरात महापालिकेच्या रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काही खासगी रुग्णालयात देखील लसीकरण सुरू आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वच केंद्रांमध्ये गर्दी झाली असताना अचानक लस संपल्याने आज लसीकरण होणार नाही, असे फलक लावल्याने गोंधळ उडाला. शालीमार येथील आयएमए, सिडको तसेच गंगापूर रुग्णालय अशा सर्वच ठिकाणी लस संपल्याने नागरिकांना परत जावे लागले. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात अवघे शंभर डोस होते आणि नागरिकांना मध्ये सोडल्यानंतर बाहेर दीडशे नागरिकांची गर्दी झाली होती. त्यांनाही आल्या पावली परत जावे लागले. गुरुवारी (दि. १) सुमारे पन्नास हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्याचे वितरण केंद्रांवर करण्यात आले.
महापालिकेकडे बुधवारीच (दि. ३१) अवघे पाच हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे महापालिकेने अगोदरच जाहीर करून मोजकीच केंद्रं सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले असते तर इतका गेांधळ झाला नसता, मात्र लसींचा पुरवठा न झाल्याने ऐनवेळी गोंधळ झाला.
इन्फो...
आज लसीकरण सुरूच राहणार
नाशिक शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांना लसींचा पुरवठा झाल्याने शुक्रवारी (दि. २) रंगपंचमीची सुटी असली तरी लसीकरण सुरूच राहणार आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार आता ३० एप्रिलपर्यंत सलग लसीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.