प्रदूषणमुक्त गोदावरीशिवाय कुंभ अशक्य
By admin | Published: January 13, 2015 11:50 PM2015-01-13T23:50:21+5:302015-01-13T23:50:49+5:30
श्री श्री रविशंकर : लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला करोडो लोक येतील. त्यावेळी जर गोदावरी नदी अस्वच्छ राहिली तर येथून रोगराई घेऊन
लोक जातील. प्रदूषणमुक्त गोदावरीशिवाय कुंभ अशक्य असून, महापालिका आणि नागरिकांनी
एकत्र येऊन युद्धपातळीवर गोदावरीसह अन्य नद्यांच्या स्वच्छतेचा
कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. महापालिकेनेही गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाणी अन्यत्र वळविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवावी, असे आवाहन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक
गुरु श्री श्री रविशंकर यांनी नाशिक महापालिकेने मखमलाबाद
नाक्यावर सुमारे बारा कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या लोकनेते
पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर अशोक मुर्तडक होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले, सहा वर्षांपूर्वी मी नाशिकला आलो होतो. तेव्हा आणि आता खूप फरक जाणवत असला तरी खराब गोष्टी नजरेत भरतातच. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांची स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. हे काम सरकार अथवा महापालिका यांच्या एकट्याने होणार नाही, तर सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन दर रविवारी चार तासांचा वेळ दिला, तर संपूर्ण शहर स्वच्छ होऊ शकेल. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या साधकांनी सोलापूरचा तलाव लोकसहभागातूनच स्वच्छ केला. वेळ हीच संपत्ती आहे आणि वेळ देणे म्हणजे संपत्ती देण्यासारखेच आहे. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणीही मिसळले जात आहे. महापालिकेने हे सांडपाण्याचे नाले अन्यत्र वळविण्याचे काम हाती घ्यावे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.