नाशिक जिल्ह्यात वाळूतस्करीला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:22 PM2018-08-20T15:22:17+5:302018-08-20T15:23:30+5:30
नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर
नाशिक : पावसाळ्यामुळे बंद पडलेली बांधकामे व नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यात चोरी, छुप्या पद्धतीने दररोज केल्या जाणाऱ्या वाळूतस्करीला आपोआपच चाप बसला असून, गेल्या महिन्यात यासंदर्भात वाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर असून, निर्माण झालेल्या वाळूच्या टंचाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे ब्रासमागील दर दुपटीने वाढले आहेत. सध्या आठ ते नऊ हजार रुपये प्रती ब्रास असा वाळूचा दर आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी वाळू ठिय्यांमध्ये आता वाळूच शिल्लक नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण, महसूल विभागाने दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राची वाळूची गरज पूर्ण करण्यासाठी जळगाव, नंदुरबार, सारंगखेडा, कोपरगाव या भागातून तस्करी करून वाळू आणली जात आहे. नाशिकबरोबरच लगतच्या ठाणे व नवी मुंबईतदेखील ही वाळू पाठविली जात असून, नाशिक शहरात दररोज २०० ते २५० वाळूचे ट्रक चोरी, छुप्या मार्गाने रवाना होत असल्याची आकडेवारी आहे. त्यातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असून यामागे वाळूतस्कर, पोलीस व महसूल खात्याची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. वाळू तस्करांकडून महिन्याकाठी ‘हप्ते’ बांधून घेतल्यामुळे ठिय्यांतून यंत्राच्या सहाय्याने वारेमाप वाळू उपसा करण्यात आला. मात्र जुलै महिन्यापासून पावसाचे आगमन सुरू झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उपसा करण्यात येणारे वाळू ठिय्ये पाण्याखाली गेले आहेत. अशातच पावसाळ्यामुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद करण्यात आल्यामुळेही वाळूची मागणी घटली, परिणामी वाळूतस्करांना आपोआपच चाप बसला आहे.