टोळीयुध्दाला चाप : गुनाजी खूनप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 08:58 PM2019-05-08T20:58:51+5:302019-05-08T21:03:01+5:30
नाशिक : किरकोळ कारणावरून कुरापत काढून १६ मे २०१५ साली मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निखिल ऊर्फ बाळ्या मनोहर मोरे ...
नाशिक : किरकोळ कारणावरून कुरापत काढून १६ मे २०१५ साली मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निखिल ऊर्फ बाळ्या मनोहर मोरे (२६) याच्यासह त्याचा चुलतभाऊ व्यंकटेश ऊर्फ व्यंक्या मोरे व नऊ साथीदारांनी मिळून गावठी पिस्तूल व धारदार शस्त्राने हल्ला चढवून गुनाजी जाधवसह तिघांवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात गुनाजी मृत्युमुखी पडला. या प्रकरणी सराईत गुन्हेगार निखिलसह अन्य दहा आरोपींना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली होती. खुनाच्या गुन्ह्यात अकरा आरोपींपैकी निखिल याचा २०१७ साली खून झाला तर उर्वरित दहापैकी सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे बुधवारी (दि.८) जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली.
पंचवटी, रामवाडी परिसरातील टोळीयुद्धाचा भडका २०१५ पासून २०१८ पर्यंत उडाला होता. २०१५ साली त्र्यंबक नाक्यावर एका बिअरबारच्या जिन्यात टोळक्याने हल्ला चढवून गुनाजी जाधव याला ठार मारले होते. या घटनेपासून टोळीयुद्ध भडकले. या हल्ल्यामधील आरोपी निखिल ऊर्फ बाळ्या मनोहर मोरे (२६) याला टोळक्याने १७ आॅगस्ट २०१७ साली गोळ्या झाडून ठार मारले होते. त्यानंतर १० जुलै २०१८ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रामवाडी भागात गुनाजी खूनप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व जखमी झालेला साक्षीदार किशोर रमेश नागरे (२६) याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता.
सरकारवाडा पोलिसांनी गुनाजी खूनप्रकरणात निखिलसह एकूण ११ आरोपी व काही अज्ञातांविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर शस्त्राचा वापर आदी गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. रवींद्र निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी १९ साक्षीदार तपासले. तत्कालीन सहायक निरिक्षक आर.व्ही.शेगर, पोलीस नाईक रविंद्रकुमार पानसरे यांनी या गुन्ह्याचा तपास कर आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करून चिकाटीने गुन्हा सिध्दतेसाठी प्रयत्न केले. या प्रकरणी पाठपुरावा करून न्यायालयापुढे गुन्हा सिद्धतेच्या दृष्टीने परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.
...या आरोपींना झाली शिक्षा
व्यंकटेश नानासाहेब मोरे ऊर्फ व्यंक्या (२७, रा. कामटवाडा, सिडको), समीर दत्तात्रय व्यवहारे (२६), अमित दत्तात्रय व्यवहारे (२४, दोघे रा. आदर्शनगर, पंचवटी), सुनील हंसराज सेनभक्त (२६, रा. स्नेहनगर, म्हसरूळ), अंकुश राजेंद्र मगर (२४, रा. क्र ांतीनगर, रामवाडी), सुशील मनोहर गायकवाड (२१, रा. मखमलाबाद नाका), अॅन्डी ऊर्फ दीपक वाघमारे (२७, रा. पंचवटी) अशी या आरोपींची नावे आहेत.
...यांची निर्दोष मुक्तता
हर्षद ऊर्फ हिरंभ पोपट निकम (२२, रा. त्रिमूर्ती चौक), संजय रमेश बोरसे ऊर्फ कामड्या (३५, रा. अशोकस्तंभ) आणि जॉन ऊर्फ विराज ऊर्फ अनिल देवीदास रेवर (रा. पंचवटी) यांची पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.