वृक्षांवरील जाहिरातबाजीला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:30 AM2019-03-19T01:30:31+5:302019-03-19T01:30:48+5:30
शहरातील वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांबाबत लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर महापालिकेने कार्यवाही सुरूच ठेवली असून, आत्तापर्यंत १३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
नाशिक : शहरातील वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांबाबत लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर महापालिकेने कार्यवाही सुरूच ठेवली असून, आत्तापर्यंत १३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर बेकायदेशीररीत्या लावलेले तीन हजार ३४१ फलक जप्त करण्यात आले आहेत. महापालिकेची करावाईची मोहीम सुरूच राहणार आहे.
शहरात राजकीय फलक मोठ्या प्रमाणात लागतात आणि त्यावर नागरिक नाराजदेखील असतात. परंतु त्यापेक्षा हजाराने फलक खासगी व्यावसायिक किंवा विक्रेते करीत असतात. महापालिकेकडे रीतसर परवानगी देण्याची यंत्रणा असताना अशाप्रकारच्या परवानग्या न घेताच व्यावसायिक सार्वजनिक किंवा खासगी मिळकतींवर जाहिराती करतात. परंतु त्यापेक्षा कठीण भाग म्हणजे झाडांवर लोखंडी पत्रे खिळ्यांनी ठोकले जातात. अशाप्रकारच्या खिळ्यांमुळे जायबंदी झालेल्या झाडांचे आयुर्मान कमी होते आणि नंतर ती कोसळतात.