पर्यटकांच्या धिंगाण्याला बसणार चाप
By admin | Published: May 23, 2017 01:18 AM2017-05-23T01:18:23+5:302017-05-23T01:19:05+5:30
नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील अकोला तालुक्यातील भंडारदरा परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील अकोला तालुक्यातील भंडारदरा परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांबरोबरच मद्यप्राशनासाठी ओल्या पार्ट्या रंगविणाऱ्यांचा धिंगाणा रोखण्यासाठी या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेंतर्गत गस्त वाढविली जाणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तर पहिल्या पावसाच्या आगमनापर्यंत भंडारदरा परिसरात काजव्यांची चमचम अनुभवयास येते. निसर्गाचा हा जीव कीटक स्वरूपातील असून, आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडांची पाने खाताना ते चमकतात. ही चमचम बघण्याच्या नावाखाली नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर परिसरातील पर्यटकांची या भागात संपूर्ण दीड महिना गर्दी लोटते. गुगलपासून तर पर्यटकांच्या हाती आलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमांपर्यंत सर्वांनीच ‘भंडारदरा काजवा महोत्सव’बाबत ‘ब्रॅण्डिंग’ केल्यामुळे आणि वनविभागाने सोडलेले मोकळे रान त्यामुळे पर्यटकांचा धिंगाणा आवाक्याबाहेर गेला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांच्या धिंगाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जैवविविधता धोक्यात आली होती. या भागातील निशाचर पक्षी, प्राण्यांना दीड महिना भक्ष्याच्या शोधासाठी जंगलात बाहेर पडणे मुश्कील झाले होते. वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लास्टिकचा कचरा, दारूच्या बाटल्या गोंगाटामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.
यंदा वनविभाग राहणार दक्ष
काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅण्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून, या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजव्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी पर्यटकांबरोबरच नैसर्गिक जैवविविधतेला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग दक्षता बाळगणार आहे. पर्यटन महामंडळ, वनविभाग, पोलीस, स्थानिक नागरिक, गाईड यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि. २२) भंडारदरा येथे पार पडली.