‘निर्भया मॅरेथॉन’मध्ये धावणार आर्ची, जान्हवी अन् अजिंक्य रहाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 05:25 PM2020-02-24T17:25:01+5:302020-02-24T17:28:48+5:30
‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी
नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी (दि.८) ‘निर्भया मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेतून महिला सुरक्षिततेचा नारा नाशिककरांकडून बुलंद केला जाणार आहे. यामध्ये अबालवृध्दांसह चक्क सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, अभिनेत्री जान्हवी कपूर, सैयामी खेर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासारखे सेलिब्रिटीही धावणार आहेत.
‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. रविवारी पहाटे ५वाजेपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. प्रथम २१ किलोमीटरचे स्पर्धक धाव घेणार आहेत. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील २१ व १० किलोमीटरच्या गटासाठी रोख रक्कम व भेटवस्तू पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. पहिले पाच स्पर्धक या दोन्ही गटांमधून निवडण्यात येणार आहे. ३कि.मी.च्या अंतरापर्यंत नाशिककरांसाठी ‘फन रन’ असणार आहे. स्पर्धेच्या नोंदणीकरीता स्वतंत्र संकेतस्थळ आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातूनही आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. जवळच्या पोलीस ठाण्यातदेखील सहभागासाठी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत (दि. २९) नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. महिला सुरक्षेसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत धाव घेण्याचे आवाहन नांगरे पाटील यांनी नाशिककरांना केले आहे.