नाशिकचे शिल्पज्ञ श्रीकृष्णाजी विनायक वझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 07:42 PM2019-03-31T19:42:59+5:302019-03-31T19:54:07+5:30
शिल्पकलानिधि या उपाधाने गौरविलेल्या गेलेल्या वझेंची आज ३१ मार्च रोजी, नव्वदावी पुण्यतिथी आणि म्हणून हा लेखनप्रपंचाचा अंजली संजय वेखंडेचा अल्पसा प्रयास.
श्रीकृष्णाजी विनायक वझे, वेरूळ लेणीविषयी लिहितात,
लेणी बघाया मग पांडवांची
गेलो वयस्यांसह मौज साची
अत्यंत रम्य स्थळ पाहता ते
संतोष झाला बहु मन्मनाते ।
सावरकरांच्या भावना आहेत या पांडवलेणी बघितल्यानंतरच्या. सावरकरांना नासिक जवळची त्रिरश्मी लेणी पाहून
आनंद वाटला कारण ती आपला इतिहास सांगते. सावरकरांची दृष्टी साहित्यिकाची आहे, पण काही अभ्यासकांनी या
लेण्यांकडे ऐतिहासिक तर काहींची क्वचित् कला म्हणून पाहाण्याची. भारताच्या ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक मूल्यांच्या
दृष्टिकोनातून लेण्यांचे महत्त्व अनन्यसाधारणच म्हंटले पाहिजे. महाराष्ट्रातील अशीच एक प्रसिद्ध लेणी म्हणजे वेरूळची लेणीहोय.
नाशिक येथील, शिल्पकलानिधि या उपाधीने विभूषित श्री कृष्णाजी विनायक वझे हे मूळचे स्थापत्य अभियंता. आंग्ल
माध्यमातून शिकलेले वझे जेव्हा पुण्याला सी ओ इ पी मधे स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेत होते, तेव्हा आपल्याकडे
असलेल्या लेण्या आणि धातूंचा वापर करून केलेल्या कलाकृतींचा अभ्यास कोणत्याही स्वरूपाने अभियंता-पाठ्यक्रमात
शिकविला जात नाही अशी खंत त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तिथून त्यांचा प्रवास सुरु झाला शिल्पशास्त्र अध्ययनाचा की त्याची परिणीती शिल्पशास्त्रावरील २७ पुस्तके लेखनात आणि अनेक शोधनिबंध लेखनात झालेली दिसते. एका अर्थाने, वझेंनी आपले संपूर्ण जीवन शिल्पशास्त्रातील संशोधनासाठी, या शास्त्राच्या पुनर्निर्माणासाठी वाहिले.
हे सर्व स्मरणात यायचे कारण म्हणजे माझ्या वाचनात आलेले बाळासाहेब पंत प्रतिनिधि यांचे एलोरा हे पुस्तक होय.
ह्या पुस्तकात मला वझेंनी वेरूळच्या लेण्यां विषयी केलेली एक प्रस्तावना वाचावयास मिळाली. वझेंची लेण्यांकडे बघण्याची
दृष्टी एका अभियंत्याची, स्थापत्यतज्ज्ञाची आहे. ते लिहितात की, कलेचे कोणतेही कार्य दोन मुद्द्यांवरुन पाहिले जाऊ शकते.
१. कलात्मक कौशल्य आणि २. सामाजिक दृष्टीकोनाच्या मानदंडांद्वारे अनुमानित आणि न्याय्य केलेले.
दोन्ही दृष्टीकोनात मोठा फरक आहे,जसे प्रथम मुद्यात, कलात्म कौशल्याबाबत, वक्र रेषा, प्रमाणबद्धता, नाजूक
सजावटीची नक्काशी, पध्दतशीर नियोजन महत्वाचे; व दुसऱ्या मुद्याचा विचार करताना कला, सामाजिक, राजकीय,
औद्योगिक आणि धार्मिक विचार आणि त्यांचे कार्य, ज्याने कार्य निष्पादित केले, त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ, आणि ज्या उद्देशाने त्याने ते केले या सगळ्यांचा विचार केला जातो. या दोन्हीही बाबींची तपासणी आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर जे संदर्भ ,निष्कर्ष काढले जातात ते नेहमीच बरोबर असत नाहीत, तरीही सामान्यतः जसे अंदाजे काही प्रमाणात आपण लेखकांचे किंवा कवींचे मन, त्याच्या शब्दांचा वापर आणि वाक्यनिर्मिती वरून समजू शकतो त्याचप्रमाणे आपण वास्तुशास्त्राज्ञाचे काम, त्याची कल्पना निर्मिती समजावून घेऊ शकतो. यातून वास्तूच्या निर्माणामागील वास्तुतज्ज्ञाच्या मनाकडे, विचारांकडे वझे निर्देश करताना दिसतात.
पुढे ते म्हणतात की, आपण एखादी कला अवलोकन करतो तेव्हा तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात. १) त्याची घनता
किंवा टिकाऊपणा. २) त्याची उपयुक्तता आणि ३) त्याची सुंदरता किंवा त्याचे आकर्षण. पहिल्या दोन घटकांचे महत्व
आपण कमी आकलू शकत नाही, जरी कला सौंदर्य सर्वोच्च आहे. कला ही सुंदर तेव्हाच मानली जाते, जेव्हा ती वस्तू
आकर्षक, टिकाऊ आणि उपयुक्त असेल. आपण सामाजिक दृष्टिकोनातून कला पाहतो, तेव्हा ती कोणत्या समयी घडविण्यात आली याचा विचार करावा लागतो. त्याच बरोबर निर्मातीच्या वेळी असलेले वातावरण, त्यावेळेस असलेल्या सामाजिक कल्पना, समाजात प्रचलित असलेले रीतिरिवाज याचा विचार करावा लागतो. कारण समाजात प्रचलित असलेले रीतिरिवाज आणि कल्पना कलेत परावर्तित होत असतात. कलेतून आपल्याला शिष्टाचाराची कल्पना, परंपरा, त्यांचे उद्दीष्ट आणि आदर्श तसेच कलाकाराची निर्माणक्षमता कळू शकते. कलेतून बघणाऱ्याला रोमांचित केले जाते.जेव्हा कलाकार एखादी कला शब्दात मांडू शकत नाही, तेव्हा तो ती गोष्ट चित्ररूपातून दर्शवितो. या सगळ्या वरील तत्वांचा उपयोग वेरूळ मधील लेणी कोरताना सुद्धा केलेला दिसतो. आपल्या या मुद्दयाचे सप्रमाण स्पष्टीकरणही ते देतात. ते म्हणतात की, टिकाऊपणाचा विचार केला तर भारतात गुहेतील खडकात निर्मिती फक्त दंडकारण्यात आढळते. याला कारण तेथील ज्वालामुखीचा खडक आहे. उत्तर भागात अनेक प्रस्तर असलेला दगड सापडतो. त्यामुळे दगडावरील नक्काशी काढणे , कोरणे कठीण जाते.
वेरूळ येथे भव्य अशा एकाच दगडात कोरलेले मंदिर आढळते. विश्वनिर्मात्याच्या नियमानुसार येथे वजनदार भाग हा
वजनाने हलक्या भागाच्या खाली आढळतो. ही कलानिर्मिती करीत असताना , अतिशय काळजीपूर्वक निपुणतेने, संरचनेच्या मुख्य आणि किरकोळ भागांमध्ये असलेला संबंध आणि प्रमाण याचा विचार करून केला गेला आहे. याठिकाणी कलाकार हाआपल्या मनात येईल तसे दगडाला वळवू शकत नव्हता. छतावरील आकृत्या काढणे हे अत्यंत कठीण काम होते. छतावर कोरताना, कोरीव काम करताना उडणारे दगड डोळ्यात जाण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होता. या मंदिरात हिवाळ्यात उबदार , उन्हाळ्यात थंड वाटते तसेच पावसाळ्यात पावसाचा त्रास जाणवत नाही. उपयुक्ततेचा विचार केला तर प्रत्येक समाजात, संसाराचे सुख आणि विचार सोडून देणाऱ्या, समाजाला प्रभावित
करणाऱ्या लोकांची आवश्यकता असते.अशा लोकांना एकांतवास आवश्यक भासतो. उपनिषदांच्या काळापासून (सुमारे4,000 इतिहासपूर्व काळ ) ते (17 व्या शतकापर्यंत ) समर्थ रामदासच्या काळापर्यंत सर्व महान विचारवंतांनी
एकाकीपणावर भर दिला आहे. अशा विचारवंतांना या लेणींसारखी एकाकीतेची सर्वात उपयुक्त ठिकाणे होती. सौंदर्याचा विचार केला तर या लेणींमध्ये कलात्मक कौशल्य उत्कृष्ट आहे. जगभरातील पर्यटक आश्चर्यचकित झाले आहेत. लेणींमधील भव्य सभाम्डपे (हॉल), खांब आणि आकृत्यांची भव्यता स्वतः पाहिल्याशिवाय कळत नाही. येथे साकारलेल्या आकृतीचा पाय हा २ फूट ९ इंच आहे. तर उंची १६ ते २५ फूट आहे. यावर अनेक सरळ आणि वक्रित रेषामध्ये सजावटीची नक्षी कोरलेली आहे .यातील साहित्य हे लाकडासारखे मऊ आणि जोडण्यास सुलभ नाही किंवा धातूंप्रमाणे मोल्ड आणि कास्टमध्ये बनवू शकत नाही. चित्रे दगडांच्या गुहेच्या भिंतींवर चिकट पाण्याने रंगविलेली आहेत आणि ते नुकतीच काढलेली आहेत असे वाटते. भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आणि विलक्षण आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदूंनी तारखांना महत्त्व दिले नाही. वेरूळ लेणी कुणी, केव्हा व कधी बांधली याचे कुठलाही तपशील आढळत नाहीत. तिथे आढळणाऱ्या शिलालेखाच्या अगोदर ही लेणी मात्र कोरली गेली होती. कोणी बांधली, किती मजूर लागले, कोणती यंत्रे वापरली या सर्व गोष्टी विचार करायला लावतात. असे मानले जाते की या लेणी साधारणतः इ.स. पूर्व २०० इ.स. ७०० पर्यंत बांधल्या गेल्या असाव्यात. इतक्या प्रगत तंत्रज्ञानाने वझे भारावून गेले आहेत असे त्यांच्या लेखनातून जाणवते. शेवटी ते म्हणतात की, एकंदर चित्राद्वारे वर्णन, वर्णनाद्वारे चित्रह्व अशी वेरूळची अप्रतिम कलाकृती आहे. वझेंचा लेण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुहेरी आहे. ते इतिहासाच्या दृष्टीने विचार करताना तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि लेण्यांतून दिसून येणारे स्थापत्य यांची सांगड घालताना दिसतात. त्याचवेळेस एका अभियंत्यांच्या दृष्टीने ती कशी उभारली गेली असावी असा तांत्रिक बाबींचा विचार करताना दिसतात आणि एका कलाकाराच्या दृष्टीने ही ते त्या लेण्यांकडे पहाताना दिसतात. ह्यातून त्यांचा अभ्यासच आपल्या नजरेत भरतो. वझेंनी स्वतः अभ्यासाने ही दृष्टी निर्माण केलेली आहे, आणि वेरूळ वरील त्यांच्या भाष्यांतून लेणी कशी पहावी याची मार्गदर्शिकाच ते आपल्याला देत आहेत असे वाटते.
- अंजली संजय वेखंडे