जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले मात्र इतर तेलबियांचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:51+5:302021-01-02T04:12:51+5:30
खरीप हंगामात जिल्ह्यात भुईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफुल, सोयाबीन आदी तेलवर्गीय पिकांची पेरणी केली जाते. वरच्या पावसावरही चांगले उत्पादन येत ...
खरीप हंगामात जिल्ह्यात भुईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफुल, सोयाबीन आदी तेलवर्गीय पिकांची पेरणी केली जाते. वरच्या पावसावरही चांगले उत्पादन येत असल्याने आणि भावही चांगला मिळत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतात. यामुळी बागायतबरोबरच जिरायत क्षेत्रातही सोयाबीनचा पेरा केला जातो. या वर्षी सोयाबीनचे ६१,४४९ हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात ८६,१८४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. एके काळी जिल्ह्यातील आदिवासी भागात तीळ, खुरसणी, मोहरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र, आदिवासी भागातील शेतकरीही नगदी पिकांकडे वळू लागल्याने या पिकांचे क्षेत्र घटले आहे. अनेक तालुक्यांत या पिकांचा आता पेराच होत नसल्यचे दिसून येते.
---चौकट ----
पिकनिहाय तेलबियांची पेरणी (हेक्टर)
पीक २०१९ २०२०
सोयाबीन ७३,५३६ ८६,१८४
भुईमूग २६,६१४ २७,३०७
तीळ १६९ १६४
खुरसणी २,९४५ २,७५३
सूर्यफुल ११६ २६
चौकट -
सूर्यफुल जिल्ह्यातून हद्दपार
सूर्यफुलाचा पेरा खूपच कमी झाला असून, या वर्षी एकट्या कळवण तालुक्यात सूर्यफुलाची पेरणी करण्यात आली होती, तर मागील वर्षी कळवण, बागलाण आणि येवला या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सूर्यफुलाची लागवड केली होती. दिवसेंदिवस पेरा कमी होऊ लागल्याने जिल्ह्यातून सूर्यफुल हे पीक हद्दपार झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
---कोट -
जिल्ह्यात तीळ, खुरसणी, सूर्यफुल ही पीक काही मोठ्या प्रमाणात घेतली जात नाहीत. खरीपात सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने त्याचा पेरा होत असतो. त्यामुळे तेलबियांच्या लागवडीवर खूप मोठ फरक पडलेला नाही.
- संजीवकुमार पडवळ, जिल्हाकृषी अधीक्षक
---कोट----
सोयाबीनला फारसा खर्च लागत नाही, शिवाय योग्य मशागत आणि वेळच्या वेळी पिकाची काळजी घेतली, तर उत्पादनही चांगले मिळते. सोयाबीनला शासनाचा हमीभावही चांगला असून, खुल्या बाजारातही चांगला दर मिळत असल्याने आम्ही दरवर्षी सोयाबीनची पेरणी करत असतो.
- दावल पगारे, शेतकरी