नाशिकमध्ये राजस्थानी- मराठी मोबाईल कारागीरांमध्ये वाद
By संजय पाठक | Published: March 22, 2024 08:00 PM2024-03-22T20:00:05+5:302024-03-22T20:00:42+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उडी: महात्मा गांधी रोडवर फलक फाडून आंदोलन
नाशिक- उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये राजस्थानी मोबाईल कारागिरांच्या विरोधात आघाडी उघडली असून माल देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका देत या व्यवसायिकांचे फलक फाडले. आज दुपारी हा प्रकार घडला. नाशिक शहरातील महात्मा गांधी रोडवर सर्वाधिक मोबाईल विक्री आणि दुरूस्तीची तसेच ॲक्सेसीरीजची दुकाने आहेत. या मोबाईल मार्केटमध्ये राजस्थानी व्यवसायिक आणि कारगिरांचा दबदबा आहे.
मराठी कारागिरांची संख्या सुमारे पाचशे ते सहाशे असून राजस्थानी व्यवसायिकांची संख्या अवघी दोनशे असताना देखील त्यांची मक्तेदारी आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यवसायिकांनी मराठी दुकानदार आणि कारागिरांना माल देणे बंद केले. त्यातून वाद उदभवला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यात उडी घेत आधी राजस्थानी व्यवसायिकांना तंबी दिली आणि माल देण्यास सांगितले होते. त्यानंतर वाद काहीसा निवाळला असला तरी आज मनसेच्या वतीने महात्मा गांधी रोडवर जाऊन पुन्हा एकदा राजस्थानी व्यवसायिकांना तंबी देत फलक फाडण्यात आले. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली हेाती.