सावत्र आईसोबत वाद; तरुणीने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:12 AM2021-09-16T01:12:51+5:302021-09-16T01:13:50+5:30
आपल्या सावत्र आईसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून चांदवड येथील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या तरुणीला सरकारवाडा पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने प्रसंगावधान दाखवत सीबीएस परिसरातून रेस्क्यू केले.
नाशिक : आपल्या सावत्र आईसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून चांदवड येथील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या तरुणीला सरकारवाडा पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने प्रसंगावधान दाखवत सीबीएस परिसरातून रेस्क्यू केले.
काही दिवसांपूर्वी घरात न सांगता गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुणे शहरात घडली. या घटनेने रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवली आहे. तसेच रात्रीच्या सुमारास एकट्या असणाऱ्या महिला वर्गाची विचारपूस केली जात आहे. ठक्कर बाजार बसस्थानकात मंगळवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी एकटी बसलेली पोलिसांना आढळून आली. ठक्कर बाजार बीट चौकीच्या अंमलदारांनी केलेल्या चौकशीत ही तरुणी सावत्र आईसोबत झालेल्या वादामुळे संतापाच्या भरात घरातून निघून आली. घरातून निघाल्यानंतर कुठे जायचे कुठे नाही याबाबत तरुणीला काहीच कल्पना नव्हती. मात्र रागाच्या भरात ती ठक्कर बाजार बसस्थानकात आली. ही माहिती सरकारवाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना मिळताच ते पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी तरुणीकडे चौकशी करून माहिती घेतली. ती चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना बोलावून घेतले. यात मुलीचा व तिच्या वडिलांचाही जबाब नोंदविण्यात आला. दोघांचे आधार कार्ड तपासून मुलीचा ताबा वडिलांना दिला.