शस्त्रसंग्रहालय मराठ्यांच्या पराक्रमाचे द्योतक

By admin | Published: January 3, 2017 11:55 PM2017-01-03T23:55:29+5:302017-01-03T23:55:48+5:30

बाबासाहेब पुरंदरे : स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा

The Armada Corridor denoted the bravery of Maratha | शस्त्रसंग्रहालय मराठ्यांच्या पराक्रमाचे द्योतक

शस्त्रसंग्रहालय मराठ्यांच्या पराक्रमाचे द्योतक

Next

नाशिक : नाशिकमध्ये उभारण्यात आलेले शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्रहालय हे मराठ्यांच्या पराक्रमाचे द्योतक असून, ते मराठीपण चिरंतन तळपत राहावे. प्रेरणादायी असलेल्या या संग्रहालयाला नाशिककरांनी जपावे आणि वाढवावे, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक ऐतिहासिक संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केली.  गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशनच्या परिसरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून जीव्हीके या कंपनीच्या सहकार्याने नाशिक महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने साकारलेल्या शिवकालीन शस्त्रसंग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पुरंदरे यांच्यासह राज ठाकरे, जीव्हीकेचे चारुदत्त देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले, प्रेरणा देणारी व थरारुन सोडणारी अशी प्रदर्शने ही महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावी, त्यासाठी माझी धडपड सुरू आहे. १९७४ मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे वर्षे पूर्ण झाली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतूनच शिवतीर्थावर शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याच बाळासाहेबांचे स्मरण व्हावे म्हणून हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयातील जुन्या तलवारी, भाले, बरच्या, पट्टे, कट्यारी या नक्कीच प्रेरणा देतील. अभ्यासकांनाही इतिहासातील बारकावे अभ्यासता येतील. प्रेरणेतूनच राष्ट्र उभे राहते, असे सांगत बाबासाहेबांनी फ्रान्समधील एका म्युझियमची प्रेरणादायी कहाणीही ऐकविली. प्रत्येकाने त्र्यंबकेश्वराचे, भद्रकालीचे दर्शन घ्यावे आणि त्यासोबत हे शस्त्रसंग्रहालयही अनुभवावे, असे आवाहन करत पुरंदरे यांनी राज यांच्याही नेतृत्वाचे कौतुक करत महत्त्वाकांक्षी नेते असतील तरच कामे होतात, अशी पावतीही दिली. प्रारंभी, जीव्हीके कंपनीचे चारुदत्त देशमुख यांनी प्रास्ताविक करताना दुसऱ्या टप्प्यात आणखी परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)







 

Web Title: The Armada Corridor denoted the bravery of Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.