सिडकोमध्ये पोलिसांचे सशस्र संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:51 PM2020-08-28T23:51:51+5:302020-08-29T00:13:17+5:30
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोलिसांच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या उद्देशाने अंबड अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे संचलन करण्यात आले.
सिडको : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोलिसांच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी या उद्देशाने अंबड अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे संचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, निरीक्षक कमलाकर जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारयांबरोबर दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते.
वडाळा, इंदिरानगरमध्ये पोलिसांचे संचलन
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब निर्माण करण्याच्या उद्देशाने वडाळा-इंदिरानगर परिसरात पोलिसांकडून शुक्रवारी (दि.२८) सशस्र संचलन करण्यात आले. श्री गणेश विसर्जन, मोहरमसह आगामी विविध सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचे संचलन करण्यात आले. संचलनाची सुरुवात शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौक येथून सुरु वात करण्यात आली.
इंदिरानगरमधील राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबा, कैलासनगर बस थांबा वडाळा-पाथर्डी रस्ता आणि वडाळा गावातील झोपडपट्टी भागातील मांगिरबाबा चौक, महेबूबनगर, मुमताजनगर, सादीकनगर, पांढरी आई देवी चौक, खंडोबा चौक आदी परिसरातून पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकाचे जवान सहभागी झाले होते.