सेनेची आक्रमकता भाजपाला डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:09 AM2017-09-22T00:09:55+5:302017-09-22T00:15:36+5:30
महापालिकेच्या महासभांमध्ये दरवेळी शिवसेनेकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे. सेनेची ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी आता भाजपातील ‘थिंक टॅँक’ पुढे आला असून, सेनेला आव्हान देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे, यापुढील महासभांमध्ये भाजपा-सेना या उभयतांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या महासभांमध्ये दरवेळी शिवसेनेकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे. सेनेची ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी आता भाजपातील ‘थिंक टॅँक’ पुढे आला असून, सेनेला आव्हान देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे, यापुढील महासभांमध्ये भाजपा-सेना या उभयतांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपाला प्रत्येक विषयावर लक्ष्य करण्याची संधी आजवर शिवसेनेने सोडलेली नाही. मार्च २०१७ पासून झालेल्या सर्वच महासभांमध्ये शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. एकेक प्रश्न मांडत भाजपाला कोंडीत पकडण्याची सेनेची खेळीही यशस्वी झालेली आहे. मागील महासभेत शिवसेनेची पीठासनावरील राजदंड पळवून नेण्यापर्यंत मजल गेली होती.
भाजपाने वेगवेगळ्या माध्यमातून सेनेवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी झालेल्या महासभेत शिवसेनेने साथरोगप्रश्नी लक्षवेधी मांडली असताना भाजपानेही लगोलग त्याच विषयावर लक्षवेध देत सेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधीवर चर्चा करण्याची संधी अगोदर भाजपा गटनेत्याला देऊन सेनेला खिजवण्यात आले. तसेच, शिवसेनाप्रणित कामगार सेनेकडून मनपा कर्मचाºयांना दिवाळीनिमित्त २० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव (ठराव क्रमांक ३८८) दि. १९ आॅगस्टला झालेल्या महासभेत दिला होता. मात्र, भाजपा गटनेत्याने सेनेला श्रेय जाऊ नये याकरिता बुधवारी झालेल्या महासभेत २० हजारांचीच मागणी करणारा प्रस्ताव (ठराव क्रमांक ५९२) दिल्याने श्रेयाचीच ही लढाई सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.