लष्करी थाटात एव्हिएशन विंग प्रदान: भारतीय सैन्यदलात ३७ लढाऊ वैमानिक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:25 PM2018-05-12T14:25:16+5:302018-05-12T14:25:16+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. २९व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊन, या तुकडीमधून ३७ वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत.
नाशिक : भारतीय भुदल सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची २९वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१२) दाखल झाली. नाशिकमधील गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चा (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ३७ वैमानिकांना उच्चपदस्थ अधिका-यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करत गौरविण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. २९व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊन, या तुकडीमधून ३७ वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, दहा प्रशिक्षणार्थी अधिका-यांनी लढाऊ वैमानिक प्रशिक्षकाच्या २८व्या तुकडीचा अभ्यासक्रमही यशस्वीपणे पुर्ण केला. यावेळी त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लष्करी थाटात ३७ वैमानिकांसह दहा प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘प्रमाणपत्र’ आर्मी एव्हिएशनचे संचालक अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट कंवल कुमार यांनी प्रदान केले.
चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सैनिकी ब्रास बॅन्ड पथकाच्या विविध सुराच्या तालावर ३७ प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंंदना दिली.
धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक नेहमीच यशस्वी ठरतो. राष्टसेवेसाठी ‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्कृष्ट अशा व्यासपीठावरून तुमचे भारतीय सैन्य दलात आगमन झाले आहे, त्याचा अभिमान बाळगावा आणि स्वत:ला सिद्ध करून अभिमानास्पद कामगिरीवर भर द्यावा,असा गुरूमंत्र कंवलकुमार यांनी यावेळी दिला. वैमानिक प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरी के ल्याबद्दल अभिषेक सिंग यांना सिल्वर चित्ता, तर उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले.