सेना-भाजपात दुरंगी सामना
By admin | Published: February 16, 2017 12:31 AM2017-02-16T00:31:34+5:302017-02-16T00:31:46+5:30
चुरस : प्रादेशिक मुद्द्याभोवती पिंगा घालणारी निवडणूक
नितीन शिंदे ठाणगाव
सह्याद्रीच्या डोंगररांगेत व सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेल्या ठाणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वनिता नामदेव शिंदे व भाजपाच्या शीलाबाई प्रभाकर हारक यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र आहे. दरवेळच्या निवडणुकीत असणारा प्रादेशिक वादाचा मुद्दा या निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवत आहे.
सिन्नरचे कोकण म्हणून ओळखला जाणारा ठाणगाव, पांढुर्ली, शिवडा हा परिसर कृषी क्षेत्रात सधन व समृद्ध आहे. तसेच येथील राजकारणही चांगलेच बहरले असल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत दिसून येते. ठाणगाव गटात अन्य पक्षांना उमेदवार मिळाला नाही त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून ठाणगाव गटात माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत या गटात तिरंगी लढत झाली होती. त्याचा फायदा कोकाटे समर्थक केरू पवार यांना झाला होता. त्यामुळे यावेळी मतविभागणी होऊ नये याची काळजी आमदार वाजे यांच्या गटाने घेतल्याचे दिसून येते. बाजार समितीचे माजी सभापती व ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांना गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पाच वर्षे त्यांनी गटातील जनतेसोबत संपर्क ठेवून या निवडणुकीत
त्यांच्या सौभाग्यवती वनिता शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर शिवडे येथील माजी
सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हारक यांच्या पत्नी शीलाबाई हारक यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. शिंदे व हारक यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
सह्याद्रीच्या पर्वतारांगांमुुळे हा गट घाटाखालचा व घाटावरचा अशा दोन भागात विभागला गेला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रादेशिकतेचा मुद्दा डोके वर काढत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या निवडणुकीतही तोच मुद्दा पुढे येऊ पाहात आहे. ३२ हजार २५९ मतदारसंख्या असलेल्या ठाणगाव गटात ठाणगाव व शिवडे असे दोन गण आहेत.
शिवसेनेने ठाणगाव गणात वेणूबाई अशोक डावरे, तर शिवडे गणात रावसाहेब म्हसुजी आढाव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ठाणगाव गणातून मंगला बाळासाहेब शिंदे, तर शिवडे गणातून तातू भागवत जगताप यांना रिंगणात उभे केले
आहे. ठाणगाव गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार हौशाबाई मुरलीधर पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच. सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सेना-भाजपात होत असलेल्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.