सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड
By Admin | Published: February 19, 2017 12:24 AM2017-02-19T00:24:26+5:302017-02-19T00:24:45+5:30
सेना-भाजपात रस्सीखेच; मनसेची धडपड
सातपूर : कामगारवर्गाने गेल्या निवडणुकीत भरभरून साथ दिल्यामुळे सिडको पाठोपाठ सातपूरला अव्वल जागा पटकाविणाऱ्या मनसेला गेल्या पाच वर्षांत लागलेल्या गळतीचा फायदा उठविण्यास सेना व भाजपामध्ये चुरस निर्माण झाली असून, त्यातही सेनेने उमेदवार देताना केलेली निवड त्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. भाजपाला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नसली तरी, यंदाच्या निवडणुकीत आयते का असेना दिलेल्या उमेदवारांमुळे मोठी आशा बाळगून आहे. सातपूर या कामगार वसाहतीवर तसे म्हटले तर कोणा एका पक्षाचे वर्चस्व कधीच नव्हते, त्यामुळे कधी सेनेला, कॉँग्रेसला साथ देणाऱ्या सातपूरकरांनी गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवित, चौदापैकी सात जागा पदरात घातल्या, त्या खालोखाल दोन्ही कॉँग्रेसला जवळ केले व सेनेला अगदीच नाममात्र जागेवर ठेवले होते. परंतु पाच वर्षांत बदललेली राजकीय परिस्थिती, प्रभाग रचनेमुळे भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे यंदाच्या निवडणुकीत सातपूरचे चित्र काहीसे वेगळे दिसू लागले आहे. मनसेच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनी पक्षाला अखेरपर्यंत साथ दिली, इतरांनी दुसरा घरोबा करीत पक्ष खिळखिळा करण्यात हातभार लावला आहे. त्यामुळे चालू निवडणुकीत पक्षाने प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी, निवडून येण्याच्या क्षमतेचा त्यात अभाव आहे, त्यामुळे घटणाऱ्या मनसेच्या जागांची भर का ढण्यास शिवसेना सरसावली आहे. ज्या पद्धतीने प्रभागात पॅनल करून उमेदवार देण्यात आले ते पाहता पक्ष म्हणून नव्हे तर उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्यांचा लाभ सेनेला होणार आहे. भाजपाचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या या पक्षाची अवस्था पाच वर्षांपूर्वी अतिशय वाईट होती, एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नव्हता, परंतु म्हणतात ना सत्तेच्या पाठीशी सारे, त्याप्रमाणे पक्षाला आलेली भरती या निवडणुकीत कामी येणार आहे. सत्तेसाठी सेना व भाजपा यांच्यातच रस्सीखेच होईल असे सध्याचे अंतिम चित्र आहे. तथापि, कामगार वर्गाच्या मतांवर डोळा ठेवून माकपानेही सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत. गेल्या निवडणुकीत या पक्षाला एक जागा मिळाली होती, ती या निवडणुकीत राखली तरी पुरेसे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन्ही कॉँग्रेसने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच पराभूत मनोवृत्तीतून उमेदवार दिल्याने या पक्षाला चमत्कारच वाचवू शकतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
अपक्षांमुळे पक्षांना धोका
सातपूर विभागात सोळा जागांपैकी अधिकाधिक जागा खेचून आणण्यासाठी सेना-भाजपात रस्सीखेच असली तरी, या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने झालेली बंडखोरीदेखील दुर्लक्षून चालणार नाही. काही प्रभागांमध्ये अगदी निवडून येण्याची क्षमता नसलेल्या अपक्षांनी बंडखोरी केल्याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याचीही तितकीच शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने सातपूर विभागात राजकीय घडामोडी घडत आहेत, ते पाहता उमेदवार पक्षावर नव्हे तर स्वत:च्या हिमतीवर निवडून येतील, भले त्याचे श्रेय पक्षाने नंतर घेतले तरी चालेल !