अस्तित्वासाठी सेना-भाजपाची ‘सत्त्वपरीक्षा’
By admin | Published: February 19, 2017 12:34 AM2017-02-19T00:34:57+5:302017-02-19T00:35:19+5:30
मतविभागणीचा फटका; नाराजांचा अपप्रचार भोवणार
नाशिक : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आजवर नाशिकरोडची ओळख सांगितली जाते. परंतु यापुढील काळात शिवसेनेला अंतर्गत गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. भाजपाचीही परिस्थिती याहून वेगळी नाही. दोन्ही पक्षांतील निष्ठावान आणि नाराजांनी चालविलेला अपप्रचार तसेच दिग्गजांच्या बंडखोरीमुळे या दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय काही प्रभागांचा अपवाद वगळता उमेदवारांनी पॅनलपेक्षा स्वकेंद्रित प्रचार सुरू केल्यामुळेही नाशिकरोडचा ‘सत्तासंघर्ष’ वर्चस्व टिकविण्यासाठीच रंगणार असल्याचे चिन्ह आहे. यंदाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांसाठी पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. तिकीट वाटपानंतर शिवसेना आणि भाजपा यांना स्वकीयांकडूनच होणारा थेट विरोध आणि कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये असलेला कार्यकर्त्यांचा दुष्काळ या पार्श्वभूमीवर या प्रमुख राजकीय पक्षांना अस्तित्वाची चिंता नक्कीच असणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे सात नगरसेवक असताना भाजपाने पोट निवडणुकीत मुसंडी मारत नगरसेवकांची संख्या दोनवरून चारवर नेली. त्यामुळे नाशिकरोडमध्ये सेनेला भाजपा टक्कर देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र युतीचे संबंध तुटल्यानंतर नाशिकरोडच्या गडावर कोण झेंडा रोवतो यासाठी दोहोंमध्ये चुरस असेल. भाजपा आणि सेनेने नाशिककरोडच्या सर्वच जागांवर उमेदवार दिल्याने खरी लढत या दोन पक्षांमध्येच होणार असल्याचे उघड आहे. नाशिकरोड मध्ये शिवसेनेचे- ७, राष्ट्रवादी- ३, कॉँग्रेस-२, मनसे- ४, भाजपा-४, रिपाइं-२ आणि अपक्ष-१ असे बलाबल आहे. परंतु बदलेली प्रभाग रचना आणि मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाल्यामुळे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे या साऱ्यांनाच शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण असल्याने पॅनल फुटल्याचे प्रकार घडले आहेत. उघडपणे ही बाब कुणी मान्य करीत नसले तरी पॅनलचे उमेदवार आता स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबवित असल्याने ही बाब समोर आली आहे. अशा वातावरणात शिवसेना, भाजपामधील बंडखोर व नाराजांनी घेतलेल्या भूमिकेमुळेदेखील उमेदवारांचा कस लागणार आहे. बदललेल्या प्रभाग रचनेचा लाभ नेमका कुणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. आयात उमेदवार, पक्षांतर केलेल्यांची वर्णी आणि स्थानिक उमेदवार यावर प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. नाराजांचा पक्षविरोधी प्रचार एकीकडे सुरू असताना पॅनलचे उमेदवार मात्र एकत्रित नसल्याने राजकीय पक्षांची दोलायमान परिस्थिती समोर आली आहे.
नाशिकरोडमध्ये माजी आमदार बबन घोलप हाच शिवसेनेचा चेहरा राहिला आहे. मात्र त्यांनी त्यांच्या दोन्ही कन्यांना रिंगणात उतरविल्याने आणि काहींच्या माथी बदलेला प्रभाग मारल्याने नाराजीचा सूर लपून राहिलेला नाही. माजी आमदार घोलप यांच्याविषयी कधीही विरोधाचा सूर नाशिकरोडमध्ये ऐकावयास मिळाला नाही, परंतु यंदा घोलप यांनाच धडा शिकविण्याचा ‘पण’ काहींनी केला आहे. माजी आमदार कन्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सेनेच्या इतर उमेदवारांवर सोपविण्याच्या राजकारणामुळेही काही सेना उमेदवार नाराज असल्याचे बोलले जाते. उमेदवारी देताना सेना-भाजपाने आयारामांना दिलेल्या संधीमुळे दुखावलेले आता अपक्षांच्या प्रचारात गुंतल्याने पक्षांनाही काहीसा घाम फुटला आहे. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसकडून यंदा फारसे आव्हान नाही. मात्र मोजक्याच जागेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे निदान काँग्रेसला आणि राष्ट्रवादीलाही किमान दोन ते तीन जागांची हमी वाटत आहे. मात्र त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांनाच सांभाळावी लागत आहे. पक्ष पातळीवर स्थानिक नेतेदेखील नाशिकरोडकडे फिरकले नाहीत. गेल्या पंचवार्षिकला मनसेचे चार नगरसेवक असतानाही यंदा त्यांना चर्चेतील चेहरा लाभू नये यातूनच त्यांची हतबलता प्रकट होते. मनसेला जुने सर्वच सोडून गेल्याने नव्यांच्या भरवशावर निवडणुकीत उतरेल्या मनसेला यश लाभण्याची शक्यता अतिशय धुसर आहे. इतर पक्षांना चमत्काराचीच अपेक्षा असेल मात्र सेना-भाजपाला काही प्रभागांचा अपवाद वगळता पॅनल फुटीचा मोठा परिणाम होण्याचीही शक्यता आहे. सर्वच पक्ष आणि अपक्षांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जोर लावल्याने काही ठिकाणी अपक्षही धक्कादायक निकाल देऊ शकतात, असे एकूण चित्र आहे.