देवळालीतील घटनेनंतर आर्मी कमांडर यांनी दिले 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश
By अझहर शेख | Published: October 11, 2024 11:37 PM2024-10-11T23:37:06+5:302024-10-11T23:37:46+5:30
इंडियन फिल्ड गन क्र-4 मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला.
नाशिक : देवळाली फील फायरिंग रेंज येथे सरावादरम्यान घडलेल्या दुर्घटनेबद्दल सदन कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेट यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसंच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गणर अग्नीवीर गोहिल विश्वराज सिंह आणि सैकत शीत यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त करत फिल्ड फायरिंग दुर्घटनेच्या मूळ कारण शोधण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' सुरू करण्यात आली आहे, असे अधिकृतरित्या दक्षिण कमांडच्या एक्स हॅन्डल वरून त्यांनी जाहीर केले.
नेमकं काय घडलं?
देवळाली कॅम्प आर्टिलरी फिल्ड फायरिंग रेंज याठिकाणी अग्नीविरांची टीम तोफ चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना इंडियन फिल्ड गनद्वारे (तोफ) बॉम्बगोळा डागत असताना झालेल्या स्फोटात दोन अग्निवीर गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. एक अग्निवीर जखमी असून लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय२०), सैफत शीत (वय२१दोघे रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) अशी मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीरांची नावे आहेत.
नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरी चे शिंगवेबहुला फायरिंग रेंज आहे. अग्निवीर नाशिकरोड तोफखाना केंद्रात भरती होऊन तेथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू आहे. गुरुवारी (दि.१०) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अग्निविरांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेलेली होती. यावेळी इंडियन फिल्ड गन क्र-4 मधून अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॉम्बचे शेल उडून या अग्निवीरांच्या शरीरात शिरले. तिघा जखमींना तात्काळ लष्करी अधिकारी व जवानांनी देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये लष्करी वाहनातून हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी गोहिल व सैफत यांना तपासून मृत घोषित केले.