जागावाटपाच्या चर्चेने सेना इच्छुकांना धाकधूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 07:40 PM2019-09-27T19:40:50+5:302019-09-27T19:43:44+5:30
गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेची युती होणार की नाही याची चर्चा रंगत असून, एकीकडे युती होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असताना जागावाटपाच्या फार्र्म्युल्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत जागा वाटपाची अंतिम बोलणी होवून जागावाटपाचे सूत्रही ठरल्याचे जाहीर झाल्याने सेनेच्या इच्छुकांची उत्सुकता ताणली गेली असून, सेनेच्या वाट्याला मिळणाऱ्या जागांमध्ये आपल्या मतदारसंघाचा समावेश आहे किंवा नाही याची धाकधूक वाढली आहे. जागावाटपात मतदार संघ पक्षाला सुटला नाही तर निवडणुकीची तयारी वाया जाऊ नये म्हणून अन्य पर्यायांचा विचारही काहींनी सुरू केला असून, त्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याची तयारी चालविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेची युती होणार की नाही याची चर्चा रंगत असून, एकीकडे युती होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असताना जागावाटपाच्या फार्र्म्युल्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचेही चित्र आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी युतीचा फार्म्युला लोकसभा निवडणुकी दरम्यानच फिफ्टी-फिफ्टी ठरल्याचे व समसमान मंत्रिपदे देण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर केले आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा काही फार्म्युला ठरलेला नसल्याचे सांगून सेनेला खोटे ठरविले आहे. युतीच्या जागावाटपात विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम ठेवण्याची चर्चा होत असताना दुसरीकडे सेनेचे मंत्री दिवाकर रावते हे सेनेचे मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडणार नसल्याचा इशारा देत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून युतीची जागावाटपाची बोलणी केली जात असून, दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर सहमती दर्शवित जागावाटपाचे सूत्रही ठरविल्याचे वृत्त आहे. राज्यातील २८८ पैकी १४४ जागांची मागणी करणा-या सेनेला भाजपने १२६ जागा देण्याची तयारी दर्शविली असून, सेनाही त्यासाठी तयार झाल्याची चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दहा जागांवर दावा सांगणा-या सेनेच्या वाट्याला किती जागा मिळतील याची उत्सुकता इच्छुकांना लागून आहे. कारण जागा वाटपात मतदारसंघ सेनेला सुटेल अशी आशा बाळगून जिल्ह्यातील नाशिक पश्चिम, नांदगाव, कळवण, बागलाण या मतदारसंघातील इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी चालविली असल्यामुळे आता या मतदारसंघाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ज्या मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांनी तयारी केली आहे, तो मतदारसंघ भाजपाला सोडल्यास सेना इच्छुक काय भूमिका घेणार? असा प्रश्न निर्माण झाला असून, इच्छुकांना आमदारकीचे पडलेले स्वप्ने पाहता पुन्हा पाच वर्षे वाट पहायला ते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते तयार नसल्यामुळे इच्छुकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.