सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी नही’

By admin | Published: January 28, 2017 11:38 PM2017-01-28T23:38:22+5:302017-01-28T23:38:39+5:30

सैनिकांची मानसिकता : शिवसेनेकडून स्वबळाचा नारा

Army-MNS coalition; 'Never' in Nashik | सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी नही’

सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी नही’

Next

नाशिक : भाजपाशी काडीमोड घेण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर आता सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र डुबत्या जहाजात बसण्याची शिवसेनेची मानसिकता दिसत नाही. शिवसैनिकांकडून स्वबळाचाच नारा दिला असताना दोन्ही ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हास बंधनकारक असल्याचे सेना-मनसेचे पदाधिकारी स्पष्ट करत आहेत.
राज्यातील दहाही महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा प्रजासत्ताकदिनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि भाजपाशी काडीमोड घेतला. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार काय, या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत सेनेची ताकद असल्याने मुंबई सेनेने घ्यावी आणि नाशिक मनसेला द्यावे, अशीही कंडी पिकविली जात आहे. सेना-मनसे युतीची चर्चा म्हणा अथवा अफवा, नाशिकमध्ये मात्र, शिवसैनिकांकडून या युतीवर फुली मारली जात आहे. भाजपाशी युती तोडल्याचा आनंदोत्सव शिवसैनिकांकडून साजरा केला जात असतानाच आता पुन्हा युतीचे झेंगाट नको, अशी मानसिकता शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे. त्यातच, नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सातत्याने मनसेला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नवनिर्माणाची खिल्ली उडवितानाच महापालिकेत सत्ताधारी मनसेला नेहमीच लक्ष्य केलेले आहे. मनसेची पुरती हवा गुल झालेली असल्याने या डुबत्या जहाजात कोण बसणार? असा सवालही सैनिक व्यक्त करत आहेत. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २८ नगरसेवकांनी पक्ष सोडलेला आहे. त्यात सर्वाधिक १७ नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहेत. सेनेमध्येच मोठ्या प्रमाणावर इच्छुक असताना मनसेशी युती करून सैनिकांची नाराजी ओढवून घेण्यासारखे असल्याची चर्चा सुरू आहे.  शिवसैनिकांची युतीबाबत मानसिकता नसताना मनसैनिकांमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला जात आहे. सेना-मनसेची युती झाल्यास महापालिकेवर सत्ता नक्की असल्याचेही म्हटले जात आहे, तर काही मनसैनिकांकडून स्वबळाचीच भाषा ऐकविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Army-MNS coalition; 'Never' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.