नाशकात सेना - मनसे तटस्थ :महापौर - उपमहापौर निवडणूक
By admin | Published: March 9, 2017 07:59 PM2017-03-09T19:59:25+5:302017-03-09T19:59:25+5:30
भाजपाचे भानसी - गिते यांचे अर्ज दाखल
नाशिक : नाशिक महापालिकेच्या महापौर - उपमहापौरपदासाठी भाजपा विरुद्ध कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी, असा सरळ सामना होणार आहे. शिवसेनेसह मनसेने मात्र महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी मतदान झाल्यास तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपाकडून महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिक महापालिकेच्या महापौर - उपमहापौरपदासाठी येत्या १४ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. महापालिका निवडणुकीत सर्वांत जास्त ६६ जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे भाजपाचाच महापौर - उपमहापौर विराजमान होणार हे स्पष्ट आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यानुसार, भाजपाकडून महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांनी, तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांनी नगरसचिवांकडे अर्ज दाखल केला, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीनेही उमेदवार देत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी आशा तडवी, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी सुषमा रवि पगारे यांनी अर्ज दाखल केला. मात्र, ३५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवसेनेने उमेदवार न देता मतदान झाल्यास तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. पाच सदस्य असलेल्या मनसेनेही तटस्थतेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध कॉँग्रेस - राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे. निवडून आलेल्या तिघा अपक्षांसह रिपाइंचा एकमेव नगरसेवकही विरोधी पक्षातच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.