सेना पुरस्कृत उमेदवार समान चिन्हाला मुकले
By admin | Published: February 9, 2017 12:53 AM2017-02-09T00:53:34+5:302017-02-09T00:53:46+5:30
सेना पुरस्कृत उमेदवार समान चिन्हाला मुकले
नाशिक : कोरे व मूळ एबी फॉर्म न जोडल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढावलेल्या शिवसेना पुरस्कृत दोन प्रभागांमधील एकूण सात उमेदवारांना अखेर एकसमान चिन्हाला मुकावे लागले आहे. पॅनलला एकच चिन्ह द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली.
प्रभाग तीसमधील शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाच्या एबी फॉर्मची सत्यप्रत जोडल्या होत्या, तर प्रभाग चारमधील चारही उमेदवारांनी कोरे एबी फॉर्म दिल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवून अपक्ष म्हणून स्वीकारले. प्रभाग चारमधील चार उमेदवारांपैकी एका महिला उमेदवारांनी पुरस्कृत गटाच्या अपक्षांसोबत बंडखोरी करत दुसरे पॅनल गाठले आहे. प्रभाग तीसच्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचे मूळ एबी फॉर्म नसल्यामुळे या उमेदवारांना वेगवेगळे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून, एकसमान चिन्हाची मागणीदेखील फेटाळून लावण्यात आल्याने या पुरस्कृत उमेदवारांना अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.