सेनेचे पुन्हा भाजपावर ‘आंदोलनास्त्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:59 AM2018-01-30T00:59:41+5:302018-01-30T01:00:11+5:30
विरोधी पक्षांपेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा राजकारण रंगले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने पुन्हा भाजपावर आंदोलनास्त्र चालविले असून, त्यासाठी इंधन दरवाढीचे निमित्त शोधले.
नाशिक : विरोधी पक्षांपेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा राजकारण रंगले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने पुन्हा भाजपावर आंदोलनास्त्र चालविले असून, त्यासाठी इंधन दरवाढीचे निमित्त शोधले. महापालिका निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे सेनेने आंदोलने केली त्याच धर्तीवर आता पुन्हा हेच अस्त्र सेनेने वापरले आहे. त्यावर भाजपाने सावध भूमिका घेतली असली तरी, उद्योग आणि वाहतूक खाते हे सेनेकडे असताना त्यात आंदोलन केले जाते, यापेक्षा दुसरे ‘व्यंगचित्र’ काय असू शकतील अशा शब्दात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी टीका केली आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनार्थ शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२७) द्वारका चौकात चक्का जाम करण्यात आले. राज्यात सरकारमध्ये असतानाही शिवसेनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तथापि, ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी वेळोवेळी सेनेने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत. विशेषत: विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेने महापालिका निवडणुकांचे निमित्त साधत आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचवेळी नाशिकच्या गंगापूर धरणातून औरंगाबाद-मराठवाड्यासाठी पाणी सोडणे तसेच नाशिकमधील औष्णिक विद्युत चंद्रपूर येथे हलविणे, आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून ते नागपूरला स्थलांतरित करणे अशा अनेक प्रकारचे मुद्दे सेनेने हेरले आणि काही आंदोलनात, तर मनसेसह अन्य विरोधी पक्षांनादेखील बरोबर घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी शनिवारी (दि.२७) मुंबई नाका येथे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सेनेने केला असला तरी थेट प्रतिआंदोलने न करणाºया भाजपाने सेनेचे हे व्यंगचित्र आंदोलन अशी संभावना केली आहे. राज्यात वाहतूक खाते आणि उद्योग खाते हे सेनेकडे असून, त्यासंदर्भात आंदोलने करण्यात आली आहेत. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्याच खात्याच्या विरोधात आंदोलने करणाºया सेनेने व्यंग निर्माण केले असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केली. वाहतूक सेनेने किमान आपल्या नेत्यांची तरी आब राखणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले.
सेनेचे आंदोलन नवीन नाही. सत्ता सोडून आंदोलने करा हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी सेनेला सल्ला दिला आहे. तथापि, सत्ताही सोडायची नाही आणि विरोधात आंदोलने करायची ही सेनेची पध्दत नागरिकांना आता अंगवळणी पडली आहे. भाजपा हाच जबाबदार सत्तारूढ पक्ष असल्याने त्यावर कधीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. - लक्ष्मण सावजी, प्रदेश चिटणीस, भाजपा